सिंधुदुर्गात गडगडाटासह मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांची तारांबळ
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 24, 2023 17:20 IST2023-11-24T17:20:36+5:302023-11-24T17:20:57+5:30
एकाच दिवसात अनुभवले तिन्ही ऋतू

सिंधुदुर्गात गडगडाटासह मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांची तारांबळ
सिंधुदुर्ग : सकाळी थंडी, दुपारी गर्मी आणि सायंकाळी पाऊस असे तिन्ही ऋतू सिंधुदुर्गनगरीवासीयांनी आज, शुक्रवारी एका दिवसात अनुभवले. दुपारी साडेचारच्या सुमारास सिंधुदुर्गनगरीसह जिल्ह्यात ठीकठिकाणी गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडाली.
सकाळी वातावरणात गारवा होता. दुपारी कडक ऊन पडल्याने गर्मीही वाढली होती. शिवाय दुपारनंतर जिल्ह्यातील वातावरण ढगाळ बनले होते आणि दुपारी साडेचारच्या सुमारास गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे जिल्हावासीयांना हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा हे तिन्ही ऋतू एका दिवसात पाहायला मिळाले.
पावसामुळे गर्मीचा त्रास थांबला. मात्र, शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेतात असलेल्या शेतकऱ्यांना कापणी केलेले भात गोळा करणे, भात गवत झाकून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. तर काही ठिकाणी गवताच्या गंजी आणि कापलेले भातही भिजले.