विकास कामे, योजनांबाबत शासनाकडून फक्त घोषणाबाजीच, परशुराम उपरकर यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:46 IST2025-08-07T14:45:54+5:302025-08-07T14:46:31+5:30

'नुसत्या घोषणा करण्यापेक्षा जनतेच्या मुलभूत प्रश्नांची सोडवणूक करावी'

Government only making slogans regarding development works and schemes, alleges Parshuram Uparkar | विकास कामे, योजनांबाबत शासनाकडून फक्त घोषणाबाजीच, परशुराम उपरकर यांचा आरोप 

विकास कामे, योजनांबाबत शासनाकडून फक्त घोषणाबाजीच, परशुराम उपरकर यांचा आरोप 

कणकवली : जिल्ह्यातील महामार्गासह अंतर्गत सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत. खड्डे बुजविण्याची पालकमंत्री नितेश राणेंनी घोषणा केली आहे. मात्र, या आधी केलेल्या कामाची देयके प्रलंबित असल्याने ठेकेदार खड्डे बुजविण्याचे काम करतील का, असाही प्रश्न आहे. त्यामुळे यावेळी देखील गणरायांना खड्डेमय रस्त्यांवरूनच आणावे लागणार आहे.  शासनाकडून विविध विकास कामे व योजनांबाबत फक्त घोषणाबाजी सुरु आहे. आश्वासनांच्या माध्यमातून जनतेच्या तोंडाला फक्त पाने फुसण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.

कणकवली तेलीआळी येथील संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, यापूर्वी आनंदाचा शिधा दिवाळी, गणेश चतुर्थीपूर्वी वाटला जात होता. मात्र, लोकसभा,विधानसभा निवडणुक झालेली असल्याने यावेळी तो अद्यापही वाटण्यात आलेला नाही. जिल्ह्यात ठेकेदारांची ८०० कोटींची बिले प्रलंबित आहेत. 

उद्धवसेनेतर्फे रस्त्यांवरील खड्यांबाबत आंदोलन करण्याचे जाहीर केल्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी खड्डे बुजविण्याची घोषणा केली आहे. मात्र, हे खड्डे कशाने बुजविणार?जांभ्या दगडाने खड्डे बुजविले तर पावसामुळे सर्वत्र चिखल निर्माण होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री महामार्गाची पाहणी करण्यासाठी येत आहेत. ही जनतेच्या डोळ्यांत फक्त धुळफेक आहे. 

यापूर्वीचे चंद्रकांत पाटील, रविंद्र चव्हाण हे सर्व बांधकाममंत्री यापूर्वी सुद्धा असेच रस्त्यांवरून फिरून गेले. वास्तविक रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी ठेकेदारांकडे असते. पण, त्यांच्या कामाचे ऑडिट आतापर्यंत कोणत्याच मंत्र्याने केलेले नाही. मुख्य म्हणजे केलेल्या कामाची देयके मिळत नसल्याने ठेकेदारही त्यांनी केलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजविणार नाहीत.

जिल्ह्यात सरकारी रुग्णालयांसाठी ८७ डॉक्टर दाखल झाल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी जनतेला दिली. वास्तविक हे सर्व डॉक्टर शिकावू आहेत. आजही ओरोस जिल्हा रुग्णालयातून गोवा - बांबोळी येथे रुग्ण अधिक उपचारासाठी हलविले जात आहेत. पालकमंत्री राणे यांनी नुसत्या घोषणा करण्यापेक्षा जनतेच्या मुलभूत प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यात मटका, जुगार, गोवा बनावट दारूची विक्री जोरात सुरु आहे. हे धंदे सत्ताधारी पक्षाचीच मंडळी करत असून त्यांना सरकारचे अभय असल्याचे दिसून येत आहे असा आरोपही उपरकर यांनी केला.

Web Title: Government only making slogans regarding development works and schemes, alleges Parshuram Uparkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.