सिंधुदुर्गातील चार गावांची समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 18:59 IST2026-01-10T18:59:12+5:302026-01-10T18:59:26+5:30
३० जानेवारीपर्यंत कार्यक्रम सुरू राहणार

सिंधुदुर्गातील चार गावांची समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत निवड
सिंधुदुर्गनगरी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सेलिब्रिटी भेटीसाठी सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये, कुडाळ तालुक्यातील अणाव आणि कणकवली तालुक्यातील कलमठ आणि लोरे नंबर-१ या चार गावांची निवड करण्यात आली आहे. या चारही गावांत नियोजित कार्यक्रमानुसार ११ रोजी सेलिब्रिटी भेट देणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यासाठी निश्चित झालेल्या सेलिब्रिटीतील शिवाली परबऐवजी रसिका वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पृथ्विक प्रताप आणि रसिका वेंगुर्लेकर हे दोन सेलिब्रिटी या चारही गावांना भेट देणार आहेत.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत चांगले काम केलेल्या गावांना भेटी देण्यासाठी राज्य शासनाने सेलिब्रिटी नियुक्त केले आहेत. यातून अभियानाची प्रचार, प्रसिद्धी शासनाचा उद्देश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी विनोदवीर कलाकार शिवाली परब आणि पृथ्विक प्रताप यांची निवड करण्यात आली होती. त्यात आता बदल करण्यात आला असून, शिवाली परबऐवजी रसिका वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आली आहे. हे दोन्ही सेलिब्रिटी ११ जानेवारी रोजी जिल्ह्यात येऊन प्रशासनाने नियुक्त केलेल्या वेत्ये, अणाव आणि कलमठ आणि लोरे नंबर-१ या चार गावांना भेट देणार आहेत.
राज्य शासनाने ग्रामीण विकासाला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी व त्यासाठी प्रशासनाला आवश्यक असलेले सहकार्य सर्व घटकांचे लाभण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान १७ सप्टेंबर २०२५ पासून राबविण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागाचा शाश्वत विकास साधतानाचे, नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या या अभियानाचा कालावधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत होता. आता ही मुदत वाढविण्यात आली आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत हा कालावधी वाढविण्यात आला आहे.
३० जानेवारीपर्यंत कार्यक्रम सुरू राहणार
५ जानेवारीपासून या सेलिब्रिटी गावभेटी कार्यक्रमाला प्रारंभ झाला आहे. ३० जानेवारीपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. यासाठी निश्चित केलेल्या सेलिब्रिटींच्या गावभेटीचे राज्यस्तर वेळापत्रक राज्याच्या ग्रामविकास विभागाने निश्चित केलेले आहे. त्यानुसार ११ जानेवारी रोजी अणाव गावात सकाळी ०९:२० वाजता सेलिब्रिटी जाणार आहेत. तेथून वेत्ये येथे ११:०० वाजता जाणार आहेत. दुपारी ०१:४० वाजता कलमठ येथे जाणार आहेत, तर शेवटची भेट लोरे नंबर-१ गावाला ०३:३० वाजता देणार आहेत. भेटीवेळी सेलिब्रिटी स्वागत स्वीकारणार असून, गावाने राबविलेल्या उपक्रमाची माहिती घेणार आहेत.