कणकवलीत बंद फ्लॅटमध्ये आग, स्टेशनरी साहित्य जळून खाक! चोवीस लाखांचे नुकसान
By सुधीर राणे | Updated: March 28, 2023 15:25 IST2023-03-28T15:25:08+5:302023-03-28T15:25:29+5:30
नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाने ही आग आटोक्यात आणली.

कणकवलीत बंद फ्लॅटमध्ये आग, स्टेशनरी साहित्य जळून खाक! चोवीस लाखांचे नुकसान
कणकवली: कणकवली तेलीआळी येथील पाताडे कॉम्प्लेक्स मधील अष्टविनायक अपार्टमेंटच्या तळमजल्यामधील एका फ्लॅटमध्ये अचानक आग लागली. या आगीत स्टेशनरी साहित्य, कपडे तसेच अन्य वस्तू जळून खाक झाल्या. आगीत एकूण २४ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाने ही आग आटोक्यात आणली.
तेलीआळी येथील पाताडे कॉम्प्लेक्समधील अष्टविनायक अपार्टमेंटच्या तळमजल्यावर नारायण सीताराम मयेकर यांनी भाड्याने फ्लॅट घेतला होता. त्यांच्यासह शरद सीताराम मयेकर, मोहन सीताराम मयेकर व दत्तप्रसाद राघो कोरगावकर अशा चौघांनी आपल्या व्यवसायासाठीचे साहित्य त्या फ्लॅटमध्ये ठेवले होते. काल, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास फ्लॅटमध्ये अचानक आग लागली.
पहाटेच्या सुमारास फ्लॅटमधून धूर येत असल्याचे दिसताच नागरिकांनी मयेकर यांना माहिती दिली. तसेच काही नागरिकांनी कणकवली नगरपंचायतीचा अग्नीशामक दलास माहिती दिली. माहिती मिळताच अग्नीशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल होत जवानांनी आग आटोक्यात आणली.
या आगीत नारायण मयेकर यांच्या स्टेशनरी वस्तूचे २ लाख ५० हजार रुपये, शरद मयेकर यांचे रेडिमेड कपडे व व्यापाराच्या वस्तूचे ७ लाख रुपये, मोहन मयेकर यांचे ३ लाख रुपये, दत्तप्रसाद कोरगावकर यांचे कापड व्यापाराच्या वस्तूचे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.