सावंतवाडी परिसरात भूकंप

By Admin | Updated: July 24, 2015 00:43 IST2015-07-23T23:54:45+5:302015-07-24T00:43:11+5:30

तीन रिश्टर स्केलची तीव्रता : केंद्रबिंदू सावंतवाडीजवळ; इमारतींना तडे

Earthquake in Sawantwadi area | सावंतवाडी परिसरात भूकंप

सावंतवाडी परिसरात भूकंप

सावंतवाडी/बांदा : सावंतवाडी परिसर गुरुवारी सकाळी भूकंपाने हादरला. तीन रिश्टर स्केलच्या तीव्रतेचे सौम्य धक्के सकाळी ११ वाजून ३४ मिनिटांनी जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू तिलारी धरणापासून ४० किलोमीटर अंतरावर सावंतवाडीच्या दिशेने असून, या भूकंपाने बांदा येथे दोन घरांना, तर सावंतवाडी शहरातील दोन इमारतींना भेगा गेल्या आहेत. मात्र, जीवितहानी झाली नाही. सावंतवाडी, दोडामार्ग वगळता जिल्ह्यात कुठेही या भूकंपाचे धक्के जाणवले नाही.
भूकंपाची दखल शासनाच्या मिरी तसेच पुणे वेधशाळेने घेतली असून कोयनानगर भूमापन केंद्राकडून अहवाल मागविला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू सावंतवाडी परिसर असल्याचे तिलारीचे कार्यकारी अभियंता धीरज साळे यांनी सांगितले. सावंतवाडी तालुक्यात गुरुवारी सकाळी ११ वाजून ३४ मिनिटांनी एकच मोठा आवाज झाला. या आवाजाने सर्वजण हादरून गेले. नेमका हा आवाज कशाचा, हे कुणालाच कळले नाही. सुरुवातीला भूसुरुंग स्फोट, तर काहीजणांनी सिलिंडरचा स्फोट झाला की काय, असे वेगवेगळे निष्कर्ष लावले. मात्र, तालुक्यातील अनेक गावांत या भूकंपाचे धक्के (पान ९वर)

घराच्या भिंतींना तडे
गुरुवारी सकाळी बांदा शहरात ११ वाजून ३६ मिनिटांनी सुमारे ३ सेकंद भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले. या धक्क्यांनी घरात असणाऱ्या व्यक्ती भयभीत झाल्याने लोकांनी घराबाहेर धाव घेतली. तसेच बाजारपेठेतदेखील व्यापाऱ्यांनी दुकानांबाहेर धाव घेतली. बांदा शहरातील देऊळवाडी येथील महादेव ऊर्फ महेश सावंत मोर्ये व सरपंच मंदार कल्याणकर यांच्या घराच्या भिंतींना तडे गेले. तसेच शहरातील विविध घरांमध्ये घरातील भांडी, वस्तू पडण्याच्या घटना घडल्या. तसेच सावंतवाडीतील जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानाच्या मागे असलेली लक्ष्मीनारायण इमारत व मदर क्विन्स शाळेच्या इमारतीला भेगा गेल्या आहेत.

सावंतवाडीत अफवा
सावंतवाडीत भूकंप झाल्याचे सर्वत्र पसरल्यानंतर माडखोल येथील धरणाला भेगा गेल्या, आंबोलीत घाटात दगड कोसळले, ओटवणे परिसरात खड्डा पडला अशा अनेक अफवांना दिवसभर शहरात ऊत आला होता. तसेच नागपूर येथे दोन दिवसांपूर्वी रस्ता खचल्याचा फोटोही टाकण्यात आला होता. त्यामुळे अनेकजण चांगलेच घाबरून गेले. मात्र, नंतर या अफवा असल्याचे पुढे आले.

सावंतवाडी, दोडामार्गात सौम्य धक्के
गुरुवारी झालेल्या भूकंपाचा धक्का सावंतवाडी परिसरातील बांदा, सोनुर्ली, मळगाव, माजगाव, चराठा, ओटवणे, इन्सुली, आदी गावांना बसला. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतर ठिकाणी धक्के जाणवले नाहीत. दोडामार्ग तालुक्यात काही सौम्य धक्के जाणवले. याची नोंद तिलारी भूमापन केंद्रात झाली आहे.

Web Title: Earthquake in Sawantwadi area