मद्यधुंद टेम्पो चालकाने सहा दुचाकी चिरडल्या; टेम्पो चालक, मालकावर गुन्हा दाखल, सावंतवाडीतील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 15:49 IST2025-09-11T15:49:10+5:302025-09-11T15:49:34+5:30

सुदैवाने यात कोणीही जखमी नाही

Drunk tempo driver crushes six two wheelers in Sawantwadi | मद्यधुंद टेम्पो चालकाने सहा दुचाकी चिरडल्या; टेम्पो चालक, मालकावर गुन्हा दाखल, सावंतवाडीतील घटना 

मद्यधुंद टेम्पो चालकाने सहा दुचाकी चिरडल्या; टेम्पो चालक, मालकावर गुन्हा दाखल, सावंतवाडीतील घटना 

सावंतवाडी : मद्यधुंद टेम्पो चालकाने येथील मच्छी मार्केट परिसरात थांबलेल्या तब्बल सहा दुचाकी चिरडल्या. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर त्या ठिकाणी दाखल झालेल्या पोलिसांनी हा जमाव पांगविला. ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मच्छी मार्केट परिसरात घडली.

दरम्यान या प्रकरणी हर्षद सुनील मेस्त्री (२१ झिरंग माठेवाडा) याच्या तक्रारीनुसार टेम्पो चालक हरिश्चंद्र शिवशरण कुमार जयस्वाल (२७ रा. शिरोडा नाका ,सावंतवाडी) व टेम्पो मालक सुनील बळवंत केळुसकर (५० माठेवाडा , सावंतवाडी) यांना पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

मंगळवारी सायंकाळी कळसुलकर इंग्लिश स्कूलसमोरील जिमजवळ काही दुचाकी उभ्या होत्या. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या एका मालवाहू टेम्पोने या दुचाकींना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सहा ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर लगेचच टेम्पो चालकाचा संशयित दारूच्या नशेत असल्याचा आरोप दुचाकी मालकांनी केला.

दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र, बराच वेळ होऊनही पोलिस घटनास्थळी दाखल झाले नाहीत. त्यामुळे नागरिक आणि दुचाकी मालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिस उपनिरीक्षक सरदार पाटील यांच्यासह हवालदार मंगेश शिंगाडे, संभाजी पाटील, मयूर निरवडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संतप्त जमावाला शांत केले आणि पुढील कारवाई सुरू केली.

दोघांवरही गुन्हा दाखल

या अपघातामुळे रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अपघात प्रकरणी टेम्पो चालकासह त्याच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून जिमसाठी आलेल्या हर्षद सुनील मेस्त्री याच्या तक्रारीनुसार टेम्पो चालक हरिश्चंद्र जयस्वाल व टेम्पो मालक सुनील केळुसकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत

सावंतवाडी मच्छी मार्केट समोरील रस्त्याच्या बाजूला पार्किंग केलेल्या दुचाकींना भरधाव वेगाने येणाऱ्या या टेम्पो चालकाने जोरदार धडक दिल्याने चार दुचाकींचे मोठे नुकसान झाले. जमलेल्या नागरिकांनी टेम्पो अडवून चालकाला ताब्यात घेतले . त्यावेळी टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत होता. तात्काळ या घटनेची माहिती सावंतवाडी पोलिसांना देण्यात आली अपघातानंतर तेथे जिमसाठी आलेल्या हर्षद सुनील मेस्त्री याच्या तक्रारीनुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तक्रारदार हर्षद मेस्त्री यांच्यासह अन्य चार ते पाच दुचाकी चा अपघात झाला.

Web Title: Drunk tempo driver crushes six two wheelers in Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.