Sindhudurg: राजन तेलींचं सावंतवाडीत शिंदे गटाकडून जोरदार स्वागत, पण दीपक केसरकरांनी फिरवली पाठ, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 17:00 IST2025-10-11T16:59:55+5:302025-10-11T17:00:44+5:30
प्रवेशानंतर प्रथमच तेली सिंधुदुर्गात

Sindhudurg: राजन तेलींचं सावंतवाडीत शिंदे गटाकडून जोरदार स्वागत, पण दीपक केसरकरांनी फिरवली पाठ, चर्चांना उधाण
सावंतवाडी : माजी आमदार राजन तेली यांनी मोठा गाजावाजा करत दसरा मेळाव्यात शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ते शुक्रवारी प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले. या त्यांच्या स्वागत कार्यक्रमापासून आमदार दीपक केसरकर यांनी चार हात लांब राहात स्वागत कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. मात्र त्यांचे सावंतवाडीतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी तेली यांनी मात्र दीपक केसरकर आणि मी एकत्र आलो तर सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील सर्व निवडणुका महायुती म्हणून स्वबळावर शंभर टक्के जिंकू. त्यांच्या सोबत काम करायला मला नक्कीच आवडेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
तर ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आमदार नीलेश राणे हे तेली यांच्या स्वागतासाठी सावंतवाडीत दाखल झाले. यावेळी सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. पण केसरकर यांनी तेलींच्या स्वागतापासून चार हात लांब राहणे पसंत केले. विशेष म्हणजे गुरूवारी आमदार दीपक केसरकर व राजन तेली यांच्यात मुंबईत एकत्र बैठक झाली होती. या बैठकीत केसरकर यांनी तेली याच्या स्वागताला हिरवा कंदील दाखवला होता. मात्र आज त्यांनी प्रत्यक्षात कार्यक्रमा पासून पाठ फिरवली आहे.
शिंदे सेनेत येण्यास अनेकजण इच्छुक: तेली
सावंतवाडीत तेली यांनी सांगितले की, मी शिंदे सेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वगृही परतलो आहे. त्यामुळे येणार्या काळात सर्वांना सोबत घेवून काम करायचे आहे. येथील जागा स्वबळावर किंवा महायुती म्हणून लढण्याची आमची तयारी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. मी आल्यानंतर अनेक जण शिंदे सेनेत येण्यास इच्छुक आहेत. लवकरच हे प्रवेश होणार आहेत. त्यामुळे त्यांचा परिपाक येणार्या निवडणुकीत नक्कीच दिसेल असे यावेळी तेली यांनी स्पष्ट केले.