Sindhudurg: शुकनदी पुलानजीक झालेल्या अपघातातील जखमीचा मृत्यू, एडगावचे ग्रामस्थ आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 17:08 IST2024-04-03T17:07:34+5:302024-04-03T17:08:12+5:30
पोलिसात धाव घेत ट्रक चालक व मालकाला हजर करण्याची मागणी

Sindhudurg: शुकनदी पुलानजीक झालेल्या अपघातातील जखमीचा मृत्यू, एडगावचे ग्रामस्थ आक्रमक
वैभववाडी (सिंधुदुर्ग): वैभववाडी-एडगाव दरम्यानच्या शुकनदी पुलानजीक झालेल्या काल, मंगळवारी झालेल्या अपघातातील जखमी रामचंद्र आकाराम रावराणे (वय-७०) यांचा मृत्यू झाला. रावराणे यांच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या एडगाव ग्रामस्थांनी आज बुधवारी सकाळी पोलिस ठाण्यात धाव घेत ट्रक चालक व मालकाला तात्काळ हजर करण्याची मागणी केली.
ट्रकचा चालक व मालकाला हजर करीत नाही; तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अवसमोल यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आपला निर्णय मागे घेतला.
काल, मंगळवारी रात्रीच्या सुमारास शुकनदी पुलानजीक ट्रकने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एडगावचे रामचंद्र रावराणे व दुचाकीवरील बबलू नामक एक व्यक्ती जखमी झाले. रावराणे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कणकवलीत नेण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला होता. तो अद्याप पोलिस स्थानकात हजर न झाल्याने एडगाव येथील ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी थेट पोलिस स्थानक गाठत फरार चालक व मालक यांना तात्काळ हजर करा अशी मागणी केली. त्यांना हजर न केल्यास मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही; अशी भूमिका घेतली.
अखेर सहाय्यक निरीक्षक अवसरमोल यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस शोध घेत असल्याचे सांगितले. तसेच काही तासात दोघांनाही पोलिस स्थानकात हजर करण्यात येईल असा आश्वासन दिले. त्यानंतर एडगावचे ग्रामस्थ शांत झाले.