चिउलुआन पोहोचला मुक्कामी! सर्वात लांब प्रवास करणारा स्थलांतरित पक्षी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 07:18 IST2025-01-17T07:17:03+5:302025-01-17T07:18:05+5:30
- संदीप बोडवे मालवण ( सिंधुदुर्ग ) : दोन महिन्यांत तब्बल १३ हजार किलोमीटर प्रवास करून चिउलुआन-२ नावाचा अमुर ...

चिउलुआन पोहोचला मुक्कामी! सर्वात लांब प्रवास करणारा स्थलांतरित पक्षी
- संदीप बोडवे
मालवण (सिंधुदुर्ग) : दोन महिन्यांत तब्बल १३ हजार किलोमीटर प्रवास करून चिउलुआन-२ नावाचा अमुर फाल्कन पक्षी अखेर दक्षिण आफ्रिकेतील यंदाच्या आपल्या मुक्कामावर सुखरूप पोहोचला आहे. जोहान्सबर्गच्या पश्चिमेला सुमारे १६० किलोमीटरवर त्याने आपला मुक्काम ठोकला आहे. याठिकाणी तीन महिन्यांच्या पाहुणचारानंतर चिउलुआन-२ परतीच्या प्रवासाला निघणार असल्याचे डब्ल्यूआयआयकडून सांगण्यात आले.
सर्वात लांब प्रवास करणारा स्थलांतरित पक्षी
अमुर फाल्कन (ससाणा) ही जगातील सर्वात लांब प्रवास करणारा स्थलांतरित पक्षी आहे. चीन, भारत, कोकणातून अरबी समुद्रमार्गे हा पक्षी आफ्रिकेला पोहोचला आहे.
मणिपूर वनविभाग व डब्ल्यूआयआयच्या विशेष पथकाने ८ नोव्हेंबर रोजी मणिपूरच्या तामेंगलाँग जिल्ह्यातील चिउलुआन येथून उपग्रह ट्रान्समीटर टॅगिंग करून सोडले होते. त्यावरुनच त्याचे नामकरण केलेल्या चिउलुआन करण्यात आले.
करु शकतो सहा हजार कीमी प्रवास
अमुर फाल्कन प्रजाती आशिया, आफ्रिका खंडातील जवळपास २१ देशांमधून साधारणतः २२ हजार किलोमीटरचा प्रवास करतो. न थांबता ६ हजार किमीचा प्रवास करू शकतो. उन्हाळ्यात आग्नेय रशिया, दक्षिण-पूर्व सायबेरिया आणि ईशान्य चीनमध्ये हा पक्षी प्रजनन करतो. त्यानंतर भारतात येतो.
- आर. सुरेश कुमार, वरिष्ठ संशोधक, डब्ल्यूआयआय
- भारतातील उत्तर-पूर्वमधील आसाम, नागालँड, मणिपूर हे या पक्ष्याचे हॉटस्पॉट आहेत. प्रवासात हा पक्षी सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान
भारतात असतो.