काजू उद्योगाला जीएसटी परतावा मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 13:49 IST2020-01-15T13:48:11+5:302020-01-15T13:49:35+5:30
काजू उद्योगाला जीएसटी परतावा देण्याबाबत तसेच काजूबोंडापासून तयार होणाऱ्या उत्पादनावरील (फेणीला) शुल्क कर सवलत देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय त्वरित घेईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात जीएसटी कमिशनसमोर घेतलेल्या बैठकीअंती महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिले.

काजू उद्योगाला जीएसटी परतावा देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.
वेंगुर्ला : काजू उद्योगाला जीएसटी परतावा देण्याबाबत तसेच काजूबोंडापासून तयार होणाऱ्या उत्पादनावरील (फेणीला) शुल्क कर सवलत देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय त्वरित घेईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात जीएसटी कमिशनसमोर घेतलेल्या बैठकीअंती महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिले.
महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनचे पदाधिकारी अध्यक्ष सुरेश बोवलेकर, उपाध्यक्ष भास्कर कामत, सचिव बिपीन वरसकर व दयानंद काणेकर यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसार्इंची भेट घेऊन काजू उद्योजकांना जीएसटी परतावा देऊन न्याय द्यावा, अशी मागणी केली होती.
त्यानुसार मंत्री देसाई यांनी या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घडवून लक्ष वेधण्याचे आश्वासन दिले होते. तसेच तेथेच जीएसटी कमिशनरांची बैठक ते आयोजित करतील व न्याय देतील, असे सांगितले होते.
यानुसार उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात जीएसटी कमिशनर यांच्यासमोर महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनचे पदाधिकारी सुरेश बोवलेकर, भास्कर कामत, बिपीन वरसकर व दयानंद काणेकर यांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकीत काजू दरावरील जीएसटी परतावा व काजू बोंडावरील उत्पादक शुल्क कर (एक्साईज ड्युटी) कमी करण्याबाबत चर्चा होऊन लवकरच निर्णय घेण्यात
येईल, असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
कोकणांतील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपण नेहमीच सकारात्मक राहिलो असून काजू उत्पादक शेतकरी कोकणच्या विकासांत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांना आपले नेहमी सहकार्य राहील, असेही पवार यांनी यावेळी या शिष्टमंडळास सांगितले.