Sindhudurg Crime: जेवण करायला घरी आला, अन् चोरी करुन पळाला; सावंतवाडीतून एकजण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 17:33 IST2023-02-07T17:31:49+5:302023-02-07T17:33:34+5:30
सावंतवाडी : घरात घुसून मोबाइलसह डंबेल्स, सोनसाखळीची चोरी केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी सालईवाडा येथील एकाला ताब्यात घेतले आहे. सायंकाळी त्यांच्यावर ...

Sindhudurg Crime: जेवण करायला घरी आला, अन् चोरी करुन पळाला; सावंतवाडीतून एकजण ताब्यात
सावंतवाडी : घरात घुसून मोबाइलसह डंबेल्स, सोनसाखळीची चोरी केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी सालईवाडा येथील एकाला ताब्यात घेतले आहे. सायंकाळी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. मुन्ना ऊर्फ साजिद इसाक शेख (४३) असे त्याचे नाव आहे.
याबाबतची तक्रार अल्ताफ अब्दुल मुल्ला रा. सालईवाडा यांनी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ३ फेब्रुवारीला घडली. सकाळी उठल्यानंतर हा प्रकार मुल्ला यांच्या लक्षात आला, असे त्यांचे म्हणणे आहे.
सालईवाडा परिसरात राहणाऱ्या मुल्ला यांच्या घरात मुन्ना हा ३ तारखेला जेवण करण्यासाठी आला होता. त्यानंतर तो निघून गेला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी घरात असलेला व्यायाम करण्याचा डंबेल्स मुल्ला यांना दिसला नाही. यावेळी रात्री कोण आले होते का? असा प्रश्न त्यांनी आपल्या घरातील व्यक्तींना केला. यावेळी मुन्ना आल्याचे घरातून सांगण्यात आले. त्यानंतर मुल्ला हे सालईवाडा येथील मुन्नाच्या घरी गेले.
यावेळी त्यांची पत्नी घरात होती. त्यांनी घरात पाहिले असता, चोरीला गेलेला डंबेल्स त्यांना त्या ठिकाणी दिसला. यावेळी तो आपला असून तो घेऊन आला, असे सांगून मुल्ला आपला डंबेल्स परत घेऊन आले.
त्यानंतर त्यांनी घरात अन्य वस्तूंची शोधाशोध केल्यानंतर त्यांचा मोबाइल आणि सोनसाखळी त्यांना दिसून आली नाही. यावेळी त्यांने घराची पाहणी केली असता, खिडकीच्या काचा व गज तोडलेले दिसले. त्यामुळे ही चोरी मुन्ना यानेच केली, असा संशय व्यक्त करत त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
त्यानुसार मुन्ना याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती ठाणे अंमलदार डुमिंग डिसोझा यांनी दिली.