सिंधुदुर्गच्या अस्मितेसाठी 'एफडी' तोडा, पण शिवरायांचा पुतळा उभारा; निलेश राणेंचा प्रशासनाला कडक इशारा
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 11, 2026 13:13 IST2026-02-11T13:12:29+5:302026-02-11T13:13:25+5:30
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वनविभागाला धारेवर धरले

सिंधुदुर्गच्या अस्मितेसाठी 'एफडी' तोडा, पण शिवरायांचा पुतळा उभारा; निलेश राणेंचा प्रशासनाला कडक इशारा
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ओरोस येथे दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा आणि त्यासाठी निधी कमी पडत असेल तर जिल्ह्याच्या मुदत ठेवी (FD) तोडा, अशी आग्रही मागणी माजी खासदार निलेश राणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. या विषयावरून त्यांनी प्रशासकीय दिरंगाईवर ताशेरे ओढत, या कामात मंत्री दीपक केसरकर यांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, असे स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वनविभागाला धारेवर धरले
वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीबाबत राणे अत्यंत आक्रमक दिसले. "गवे आणि माकडांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांनी शेती करायची की नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वनविभागाच्या बजेटमध्ये संरक्षक भिंती आणि कंपाऊंडसाठी नेमकी काय तरतूद आहे, याचा जाब त्यांनी विचारला. तसेच, प्राण्यांची संख्या मर्यादित करण्यासाठी नसबंदीचा पर्याय वापरण्याची सूचना करत, शेतकऱ्यांसाठी तातडीने 'टोल फ्री' क्रमांक सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. डीएफओ (DFO) यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा गाठ माझ्याशी आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
वाचा : लोकांना उत्तरं काय द्यायची; जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्री नितेश राणेंनी प्रशासनाला झापले
अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस अधीक्षकांना सवाल
जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त करत राणे यांनी पोलीस अधीक्षकांना धारेवर धरले. जिल्ह्यात ड्रग्ज, बनावट दारू आणि बीफची तस्करी कशी सुरू आहे? असा प्रश्न करत त्यांनी या अवैध धंद्यांचा बिमोड करण्याची मागणी केली. तरुण पिढी बरबाद होत असताना पोलीस प्रशासन काय करत आहे, असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
प्रशासनासाठी प्रमुख मागण्या
शिवस्मारक: ओरोस येथे भव्य पुतळा व परिसराचे सुशोभीकरण.
वन्यप्राणी बंदोबस्त: गवे व माकडांचा त्रास रोखण्यासाठी संरक्षक भिंतींचे नियोजन.
शेतकरी मदत: नुकसान भरपाई आणि तक्रारीसाठी २४ तास हेल्पलाइन.
नसबंदी: वाढत्या वन्यप्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना.
पोलीस प्रशासनाला 'अल्टिमेटम'
- ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग: जिल्ह्याला नशेच्या विळख्यातून बाहेर काढा.
- तस्करीवर लगाम: बनावट दारू आणि गोमांस तस्करीच्या अड्ड्यांवर धाडी टाका.
- कार्यक्षमता: गुन्हेगारी थांबवण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष द्यावे.