सिंधुदुर्ग: बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला विहिरीत, मोर्ले गावातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 11:26 IST2022-08-13T11:26:13+5:302022-08-13T11:26:46+5:30
या प्रकरणाबाबत अद्याप कोणताही सुगावा लागला नाही

सिंधुदुर्ग: बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला विहिरीत, मोर्ले गावातील घटना
दोडामार्ग : पोस्टातील आरडीचे पैसे जमा करण्यासाठी गावात जाते असे सांगून घरातून निघालेल्या महिलेचा मृतदेह दोन दिवसांनी विहिरीत सापडला. मृत संगीता मणेरीकर (५४) ही महिला मोर्ले गावातील असून घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत पुढील तपास पोलीस संजय गवस करीत असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संगीता मणेरीकर ही गावातील पोस्टात आरडीचे पैसे जमा करण्याचे काम करायची. बुधवारी ती आरडीचे पैसे जमा करण्यासाठी गावात जाते असे सांगून सकाळी ९.३० वाजता घरातून निघाली. ती, रात्री उशिरापर्यंत घरी परत आलीच नाही. नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतु त्यादिवशी ती भेटली नाही. त्यामुळे तिचे दीर उदय अनंत मणेरीकर यांनी येथील पोलीस ठाण्यात संगीता मणेरीकर या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती.
शुक्रवारी एका व्यक्तीला तिचा मृतदेह तेथील विहिरीत तरंगत असल्याचा दृष्टीस पडला. त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना दिली. याबाबत पोलिसांना काळविताच पोलीस निरीक्षक वृषिकेश अधिकारे व कर्मचारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दोडामार्ग रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणा बाबत अद्याप कोणताही सुगावा लागला नसून पुढील तपास पोलीस संजय गवस करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अधिकारे यांनी दिली.