रवींद्र चव्हाण यांच्यावरील खोटे आरोप भाजप सहन करणार नाही - आशिष शेलार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 16:59 IST2025-12-01T16:56:58+5:302025-12-01T16:59:07+5:30
Local Body Election: नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्न उपस्थित करणे, हा विरोधकांनी रडीचा डाव.

रवींद्र चव्हाण यांच्यावरील खोटे आरोप भाजप सहन करणार नाही - आशिष शेलार
मालवण: मालवण पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप उमेदवारांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद 'काळ्या दगडावरची पांढरी रेष' असल्याचे सांगत मालवणकरांचे मन आणि मत भाजपच्या बाजूने ठरले आहे, असा ठाम विश्वास व्यक्त करत, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरील खोटे आरोप भाजप सहन करणार नाही, "सूर्यावर उडवलेली थुंकी तुमच्या तोंडावर उडेल," अशी सणसणीत टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्न उपस्थित करणे, हा विरोधकांनी 'रडीचा डाव' टाकल्याचा पुरावा आहे. कोणाच्या मायचा लाल या प्रमाणपत्रावर प्रश्न उपस्थित करू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आज शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, विजय केनवडेकर, राजू परुळेकर, विकी तोरसकर यांच्यासह सर्व उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शेलार म्हणाले, आम्हाला सेवा कोण देईल? रोज कोण भेटेल? विकासाची कामे कोण करेल? रस्ते, पाणी, गटार, सुशोभिकरण, दिवाबत्ती या सगळ्यात आमच्याबरोबर कोण राहील?' या मुद्द्यांवर निवडणूक लढणे अपेक्षित आहे आणि भाजपची तीच भूमिका आहे. सेवक म्हणून आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत असे सांगितले.
विकासाचा मुद्दा हाच भाजपचा अजेंडा
मालवण शहराला सांस्कृतिक ओळख देणाऱ्या मामा वरेरकर नाट्यगृहाचे काम करण्याची धमक भाजपकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गडकिल्ल्यांचा, ज्यात सिंधुदुर्ग आणि विजयदुर्गचा समावेश आहे, जागतिक वारसा स्थळात समावेश करण्याचे सौभाग्य भाजपला मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला. विकासाचा मुद्दा हाच भाजपचा अजेंडा असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली. मालवण आणि मालवणी माणसाला कोणीही बदनाम करण्याचे काम केले तर भारतीय जनता पक्ष ते सहन करणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.
