खड्ड्याने घेतला सहायक लेखाधिकाऱ्याचा बळी, सिंधुदुर्गमध्ये दुचाकी खड्ड्यात आदळून झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 13:58 IST2025-09-24T13:58:03+5:302025-09-24T13:58:19+5:30
रस्त्यावर फेकल्या गेल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत

खड्ड्याने घेतला सहायक लेखाधिकाऱ्याचा बळी, सिंधुदुर्गमध्ये दुचाकी खड्ड्यात आदळून झाला अपघात
ओरोस : सिंधुदुर्गनगरी येथील डॉन बॉस्को सर्कल येथील डॉन बॉस्को गेटसमोरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात मंगळवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या दरम्यान बाईक आदळून झालेल्या अपघातातसिंधुदुर्गनगरी येथील सहाय्यक लेखाधिकारी हेमलता धोंडू कुडाळकर (वय ४२, रा. कुडाळ) यांचा मृत्यू झाला.
हेमलता कुडाळकर या जिल्हा परिषदेतील लेखा आणि कोषागार कार्यालयामध्ये सहाय्यक लेखाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. पतपेढीमधील कामासाठी त्या गेल्या होत्या. तेथून जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागातील एका कर्मचाऱ्याच्या दुचाकीवरून त्या जिल्हा परिषदेकडे येत असताना डॉन बॉस्को समोरील खड्ड्यात त्यांची बाईक आदळली.
वाचा- राज्यातील रस्ते खड्डेमुक्त होणार, १२९६ कोटींचा निधी मंजूर; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी दिली माहिती
पाठीमागे बसलेल्या कुडाळकर रस्त्यावर फेकल्या गेल्या. डोक्यात गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.. त्यांच्या पश्चात एक विवाहित भाऊ व बहिण असा परिवार आहे. पत्रकार विलास कुडाळकर यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत्या.
सोमवारी नर्सदेखील झाली होती जखमी
सोमवारी पोलिस अधीक्षक कार्यालयामोरील रस्त्यावर एक नर्स आपल्या दुचाकीवरून खड्ड्यांचा अंदाज न आल्याने त्या खड्ड्यात पडून जखमी झाल्या आहेत.
खड्ड्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
सिंधुदुर्गनगरीतील सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य जागोजागी पाहायला मिळत आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी वारंवार आवाज उठवूनही प्रशासन याकडे गांभीर्याने घेताना दिसत नाही. रानबांबुळी येथे मालवणकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि कुडाळकडे जाणाऱ्या रस्त्यावरही जीवघेणे खड्डे पडले असून प्रशासनाने हे खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.