सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल ४०६ साकव नादुरुस्त, सीईओ रवींद्र खेबुडकर यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:19 IST2025-06-17T16:19:08+5:302025-06-17T16:19:49+5:30

कुंडमळातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट

As many as 406 sewage treatment plants are in disrepair in Sindhudurg district, CEO Ravindra Khebudkar gave information | सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल ४०६ साकव नादुरुस्त, सीईओ रवींद्र खेबुडकर यांनी दिली माहिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल ४०६ साकव नादुरुस्त, सीईओ रवींद्र खेबुडकर यांनी दिली माहिती

ओरोस : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळल्याच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नादुरुस्त साकवांबाबत आढावा घेतला असून, नादुरुस्त साकवांची माहिती गोळा करण्याची कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत ८१३ साकव असून त्यापैकी १६९ सुस्थितीत आहेत. ४०६ नादुरुस्त असून त्यासाठी ३३ कोटी १४ लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे जे साकव नादुरुस्त आहेत, त्या ठिकाणी हा साकव नागरिकांनी वापरू नये, असे आवाहन करणारे फलक लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते. खेबुडकर म्हणाले की, रविवारी पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील दुर्घटनेची गंभीर दखल पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली आहे. त्यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाशी ऑनलाइन पद्धतीने संपर्क साधून जिल्ह्यातील नादुरुस्त साकवांबाबत आढावा घेतला. नादुरुस्त साकवांची माहिती गोळा करण्याचे तसेच नादुरुस्त साकवांचा वापर होऊ नये, याकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील साकवांची माहिती गोळा केली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

वाचा - धोकादायक साकव, पूल नागरिकांच्या वापरासाठी बंद करा; पालकमंत्री नितेश राणेंनी दिले निर्देश 

१७५ साकव नव्याने  बांधले जाणार

सद्य:स्थितीत जिल्ह्यात ८१३ साकव आहेत. यांपैकी १६९ साकव सुस्थितीत आहेत. ४०६ नादुरुस्त आहेत.  १३८ साकव निर्लेखित करून त्या ठिकाणी नवीन साकव बांधले जाणार आहेत. त्याचप्रमाणे आणखी १७५ साकव नव्याने बांधले जाणार आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली.

नवीन साकवांसाठी ९७ कोटी आवश्यक

४०६ नादुरुस्त साकव वगळून निर्लेखित झाकलेले नाही. नव्याने बांधण्यात येणाऱ्या साकवांसाठी तब्बल ९७ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. याशिवाय आणखी ३३७ ठिकाणी नव्याने साकव बांधण्याची मागणी प्रशासनाकडे आलेली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी यावेळी दिली.

‘त्या’ ठिकाणी फलक लावणार

जिल्ह्यातील ४०६ साकव नादुरुस्त आहेत. यातील काही साकव अत्यंत धोकादायक आहेत. त्यामुळे या नादुरुस्त साकवांच्या ठिकाणी नागरिकांनी साकवाचा वापर करू नये, असे आवाहन करणारे फलक लावण्यात येणार असल्याचेही  खेबुडकर यांनी सांगितले.

Web Title: As many as 406 sewage treatment plants are in disrepair in Sindhudurg district, CEO Ravindra Khebudkar gave information