सुरेश प्रभूं व्यतिरिक्त कोणताही उमेदवार लादल्यास प्रचार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 06:11 PM2019-02-13T18:11:40+5:302019-02-13T18:13:36+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघातून भाजपाच्यावतीने केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनाच उमेदवारी देण्यात यावी. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी गेल्या पाच वर्षात

Apart from Suresh Prabhu, there is no publicity if no candidate is imposed | सुरेश प्रभूं व्यतिरिक्त कोणताही उमेदवार लादल्यास प्रचार नाही

सुरेश प्रभूं व्यतिरिक्त कोणताही उमेदवार लादल्यास प्रचार नाही

Next
ठळक मुद्देभाजप कार्यकर्त्यांचा निर्धार : कणकवलीतील पत्रकार परिषदेत केले जाहीर'राऊत नको...प्रभूच हवे...' !

कणकवली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघातून भाजपाच्यावतीने  केंद्रीय मंत्री  सुरेश प्रभू यांनाच  उमेदवारी देण्यात यावी.  शिवसेना खासदार  विनायक राऊत यांनी गेल्या पाच वर्षात भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे विनायक राऊत यांच्यासह अन्य पक्षाचा कोणताही उमेदवार लादल्यास भाजपा कार्यकर्ते कोणत्याही परिस्थितीत त्यांचा प्रचार करणार नाहीत असा निर्धार  कणकवली तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी  केला आहे. तसेच वरिष्ठ स्तरावर आपले म्हणणे मांडले  असल्याची माहिती भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, राजश्री धुमाळे यांनी येथे दिली.

       

कणकवली येथील भाजप संपर्क कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष संदेश सावंत -पटेल, माजी तालुकाध्यक्ष शिशिर परुळेकर, भाजपा सरपंच आघाडी जिल्हाध्यक्ष रमेश पावसकर, पशुराम झगडे, तालुका सरचिटणीस बबलू सावंत, पप्पू पूजारे, प्रदीप गावडे ,समर्थ राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

       यावेळी राजश्री धुमाळे म्हणाल्या,
कणकवली रेल्वे स्थानक सुशोभीकरण, बांधकरवाडी अंडरपासचे काम केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यामुळे साध्य झाले आहे. मात्र, या कामांचा  शुभारंभ आणि उदघाटन करताना  खासदार विनायक राऊत यांना भाजपाचा विसर पडला. सन 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत  मोदी लाटेत विनायक राऊत खासदार झाले आहेत. त्यांचा प्रचार भाजप कार्यकर्त्यानी केला त्यामुळे निवडणुकीत त्यांना यश मिळाले. मात्र,  निवडणुकीच्या वेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून व विनायक राऊत यांच्याकडून भाजपला दिलेली आश्वासने पाळण्यात आलेली नाहीत. विकास कामांसाठी निधीही दिलेला नाही. त्यामुळे आम्हाला भाजपचा हक्काचा खासदार हवा आहे. सुरेश प्रभूंच्या रूपाने तो आम्हाला मिळू शकतो.

        यावेळी राजन चिके म्हणाले, सुरेश प्रभू लोकसभेत निवडून गेल्यावर ते पुन्हा मंत्री होतील.तर इतर कोणीही व्यक्ती निवडून गेली तर ती फक्त खासदारच रहाणार आहे. त्यामुळे येथील विकास खुंटणार आहे. त्यासाठी आम्ही सर्वानुमते सुरेश प्रभू यांनाच खासदारकीची उमेदवारी द्यावी . अशी मागणी केली आहे.
पनवेल येथील भाजपा मेळाव्यात आम्ही भाजपाच्या हक्काच्या खासदारासाठी प्रभू यांचेच नाव सुचवले आहे.

           संदेश सावंत - पटेल म्हणाले , सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेने भाजपाला नेहमीच फसवले आहे.  त्यामुळे कोअर कमिटीकडे प्रभू यांच्या लोकसभा उमेदवारीसाठी आम्ही आग्रह धरला आहे. कोअर कमिटीनेही वरिष्ठांकडे आमची मागणी पोहोचवली आहे.

         परशुराम झगडे म्हणाले,  ज्यांनी विनायक  राऊत यांचा प्रचार केला त्या भाजपा कार्यकर्त्यांशी संपर्क नसल्याने ते ओळखूही शकणार नाहीत .अशी स्थिती आहे. भाजपाशी समन्वय ठेवण्यात राऊत असफल ठरले आहेत.              

          रमेश पावसकर म्हणाले, सिंधुदुर्ग  जिल्ह्यात भाजपाचे ७४ सरपंच, ६० उपसरपंच, ९०० ग्रामपंचायत सदस्य आहेत. मात्र , संबधित सरपंच , उपसरपंच , सदस्य असलेल्या गावात खासदारांकडून निधीच देण्यात न आल्याने विकास कामे करताना अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे आमच्या हक्काच्या खासदारांच्या माध्यमातून गावविकासासाठी निधी मिळण्यासाठी सुरेश प्रभूच उमेदवार असणे गरजेचे आहे. असेही पावसकर यावेळी म्हणाले.

         बबलू सावंत म्हणाले, आमच्या मित्रपक्षातील असलेल्या खासदारांकडून सिवर्ल्ड, नाणार अशा प्रकल्पाना विरोध केला जात आहे. रोजगार निर्माण करणारे प्रकल्प जर जिल्ह्यात आले नाहीत.तर बेरोजगारी आणखीन वाढणार आहे. तरुणांना रोजगार देऊ न शकणारे खासदार काय कामाचे? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

'राऊत नको...प्रभूच हवे...' !

गेल्या पाच वर्षात खासदार विनायक राऊत व शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून  भाजपचे खच्चीकरण करण्यात आले आहे. त्यांनी भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळेच ' राऊत नको...प्रभूच हवे...' अशी आमची मागणी आहे. या मागणीला सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद लाभत आहे. जनतेलाही सुरेश प्रभूच खासदार म्हणून हवे आहेत. असे यावेळी राजश्री धुमाळे यांनी सांगितले.

Web Title: Apart from Suresh Prabhu, there is no publicity if no candidate is imposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.