आंबोली हाऊसफुल्ल; बेळगाव, गोवा, कोल्हापूर येथील पर्यटकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:49 IST2025-07-21T13:49:08+5:302025-07-21T13:49:57+5:30
पोलिस वाहतूक कोंडी सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते

आंबोली हाऊसफुल्ल; बेळगाव, गोवा, कोल्हापूर येथील पर्यटकांची गर्दी
सावंतवाडी : श्रावण मास सुरू होण्यापूर्वीचा रविवार असल्याने आंबोली येथील वर्षा पर्यटन हाऊसफुल्ल झाले होते. रविवारी हजारो पर्यटक आंबोली येथे दाखल झाले होते. मुख्य धबधब्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे वाहतूक कोंडीही झाली होती.
पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता. मात्र, किरकोळ बाचाबाचीचे प्रकार घडत होते. कर्नाटकातील काही पर्यटक हुल्लडबाजी करत असताना त्यांना पोलिसांकडून दणका दिला.
येणाऱ्या गुरूवारपासून श्रावण मास सुरू होत असून आंबोलीत रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दुपारच्या सत्रात पर्यटक मोठ्या प्रमाणात धबधब्यावर आल्याने वाहतूक कोंडी झाली होती. बेळगाव, गोवा, कोल्हापूर येथील पर्यटकांचा भरणा मोठा होता.
पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. पोलिस वाहतूक कोंडी सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. मात्र, उशिरापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नसला तरीही किरकोळ वादाचे प्रकार घडत होते.