सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार कोसळूनही गतवर्षीच्या सरासरीपेक्षा मागेच, अधून-मधून जोरदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 16:53 IST2025-09-01T16:53:27+5:302025-09-01T16:53:50+5:30

३१ ऑगस्टपर्यंत सरासरी २५०७.८ मिलीमीटर पाऊस

Although Sindhudurg district has received heavy rains the rainfall this year has been less than last year | सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार कोसळूनही गतवर्षीच्या सरासरीपेक्षा मागेच, अधून-मधून जोरदार पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार कोसळूनही गतवर्षीच्या सरासरीपेक्षा मागेच, अधून-मधून जोरदार पाऊस

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. या महिन्यात मुसळधार पाऊस पडला आहे. असे असले तरी पावसाने गतवर्षीची सरासरी अद्याप गाठलेली नाही. गेल्यावर्षी आजअखेर (३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत) सरासरी ३३०५.८ मिलीमीटर पाऊस पडला होता. तोच चालू वर्षात आजपर्यंत (३१ ऑगस्ट रोजी) सरासरी २५०७.८ मिलीमीटर पाऊस पडला आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षात सरासरी ७९८ मिलीमीटर पाऊस कमी पडला आहे. सप्टेंबर महिन्यात आणि परतीच्यावेळी पावसाचा जोर कायम राहिल्यास पाऊस आपली सरासरी गाठू शकतो.

जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या मानाने मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. कधी-कधी तर वादळी वाऱ्यासह पडणारा मुसळधार पाऊस जिल्ह्याला झोडपून काढतो. पावसाच्या हंगामापूर्वीच मे महिन्यात पडलेल्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले होते. त्यानंतर जून पासून सुरू झालेला पाऊस अद्यापही सुरूच आहे. जून महिन्यात समाधानकारक पडणाऱ्या पावसाने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मुसळधार कोसळण्यास सुरुवात केली होती. जिल्ह्यात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील २४ धरणे ओव्हर फ्लो झाली असून त्यांच्या मधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सध्या गणेशोत्सव चालू असून यावेळीही अधून-मधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत.

२०२५ मधील पावसाची आकडे पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात सरासरी पाऊस कमी झाला आहेत. त्यात ऑगस्ट महिन्यात एकूण सरासरीच्या वरती पाऊस पडला आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार जून महिन्यात सरासरी ८८०.१ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. तो यावेळी जून महिन्यात सरासरी ६७३.५ मिलीमीटर एवढा पाऊस पडला म्हणजेच ७६.५ टक्के पाऊस जून महिन्यात पडला. जुलै महिन्यात सरासरी १०४३.६ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र, जुलै महिन्यात सरासरी ९७५.६ मिलीमीटर पाऊस पडला त्याची टक्केवारी ९३.५ एवढी आहे. तर ऑगस्ट महिन्यात सरासरी ६८९.२ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते.

मात्र, या महिन्यात सरासरी ८५८.७ मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे या महिन्यात १२४.६ टक्के पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात जास्त पाऊस पडला आहे. असे असले तरी एकूण सरासरी पाऊस गतवर्षीच्या तुलनेत कमीच आहे. गेल्यावर्षी आजअखेर (३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत) सरासरी ३३०५.८ मिलीमीटर पाऊस पडला होता. तोच चालू वर्षात आजपर्यंत (३१ ऑगस्टला) सरासरी २५०७.८ मिलीमीटर पाऊस पडला आहे.

अद्यापही सरासरी ७९८ मिमी. कमीच..

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला असला तरी गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षात सरासरी ७९८ मिमी. पाऊस कमी पडला आहे. सप्टेंबर महिन्यात आणि परतीच्या वेळी पावसाचा जोर कायम राहिल्यास पाऊस आपली सरासरी गाठू शकतो. त्यात मे महिन्यात पडलेला सरासरी २०० मिमी. पाऊस पकडला तरी सुमारे सरासरी ५९८ मिमी. पाऊस अद्यापही कमीच पडल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: Although Sindhudurg district has received heavy rains the rainfall this year has been less than last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.