सावंतवाडीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट, चक्क नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नाॅट रिचेबल, पाच जागांवर निवडणूक लढविण्याची नामुष्की
By अनंत खं.जाधव | Updated: November 18, 2025 09:26 IST2025-11-18T09:25:48+5:302025-11-18T09:26:06+5:30
Sawantwadi Election: एकीकडे महायुती मध्ये वादाची ठिणगी पडलेली असतनाच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातच अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी फूट पडल्याचे दिसून आले.

सावंतवाडीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट, चक्क नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नाॅट रिचेबल, पाच जागांवर निवडणूक लढविण्याची नामुष्की
सावंतवाडी - एकीकडे महायुती मध्ये वादाची ठिणगी पडलेली असतनाच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातच अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी फूट पडल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी नाव जाहीर करण्यात आलेल्या उमेदवार उल्का वारंग व त्यांचे पती व विधानसभा प्रमुख उमाकांत वारंग यांनी ऐनवेळी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेकडे पाठ फिरवली.
त्यामुळे अवघे पाच उमेदवारांचे अर्ज भरून राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले आहे. तर दुसरीकडे महायुती होणार की नाही?, याबाबत अद्याप माहित नाही परंतु आम्ही पाच उमेदवार घेऊन स्वबळावर लढू आणि निवडू. आम्ही पाच जण पन्नास जणांना भारी आहोत, असा दावा तालुकाप्रमुख उदय भोसले यांनी केला आहे.
सावंतवाडीत मागील आठवडय़ात राष्ट्रवादी अजित पवार गटांकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला होता.त्यामुळे सावंतवाडीत चौरंगी लढत होणार हे निश्चित होते पण एकीकडे राष्ट्रवादी कडून उमेदवार उभे करण्याची चाचपणी सुरू असतनाच दुसरीकडे मात्र महायुती मधील नेत्यांशी उमाकांत वारंग याच्या माध्यमातून बोलणी सुरू होती.असे असतनाच आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वारंग यांनी नगराध्यक्ष पदासह अन्य उमेदवार नगरपरिषद मध्ये आले नसल्याने राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांचा गोंधळ उडाला आणि अवघे पाच जण राहिले मग त्यानीच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.यात प्रभाग नऊ अगस्तीन फर्नांडिस प्रभाग सहा उदय भोसले, दिशा कामत प्रभाग आठ रंजना निर्मल प्रभाग दहा सत्यवान चेंदवणकर यांनी यावेळी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
यावेळी भोसले म्हणाले, या ठिकाणी आम्ही फक्त लढण्यासाठी उभे राहिलो आहोत. महायुती होणार की नाही?, याबाबत अद्यापपर्यंत माहिती नाही. तरीही आम्ही स्वबळावर लढणार. आम्ही पाच जण पन्नास जणांना भारी आहोत. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लोकांना सामोरे जाणार आहोत. काही झाले तरी या ठिकाणी जास्तीत-जास्त उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वारंग यांच्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, अद्यापपर्यंत आपल्याला काही समजले नाही.
त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आले होते. परंतु त्यांचा संपर्क झाला नाही. त्यांचा मोबाईल नोटरीचेबल होता. त्यामुळे नेमके काय झाले?, हे आपण त्यांच्याशी भेटून चर्चा करू. नंतरच आपल्याला ते कळेल. तोपर्यंत आपण तूर्ताच काहीच बोलू शकत नाही, असे ते म्हणाले.