Sindhudurg: अनधिकृत मासेमारी करणाऱ्या कर्नाटकच्या नौकेवर कारवाई, तांडेलसह ७ खलाशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 18:53 IST2025-11-26T18:53:27+5:302025-11-26T18:53:51+5:30
नौका जप्त, आचरा येथील खोल समुद्रात मासेमारी

Sindhudurg: अनधिकृत मासेमारी करणाऱ्या कर्नाटकच्या नौकेवर कारवाई, तांडेलसह ७ खलाशी
देवगड : महाराष्ट्राच्या सागरी मत्स्य व्यवसाय क्षेत्राचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने मत्स्य व्यवसाय विभाग सतत सजग असून, परप्रांतीय नौकांमार्फत होणाऱ्या अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. याच धोरणांतर्गत मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्याच्या एका मासेमारी नौकेवर यशस्वी कारवाई करण्यात आली आहे.
मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे ०३:४५ वाजताच्या सुमारास आचरासमोर सागरी हद्दीत सुमारे १४ वाव अंतरावर नियमित गस्तीदरम्यान कलमाडी, उडुपी, जि. मलप्पी, कर्नाटक येथील राजाधगिरी दिवाकर कलमाडी यांच्या मालकीची IND-KA-02-MM-४५२३ या नौकेवरती ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ तसेच सुधारित अधिनियम २०२१ च्या तरतुदींनुसार ही बेकायदा मासेमारी आढळून आल्याने संबंधित नौका जप्त करण्यात आली.
नौकेवर तांडेलसह ७ खलाशी
नौका महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत कोणताही वैध परवाना नसताना ट्रॉलिंगद्वारे मासेमारी करताना आढळून आली. नौकेवर नौका तांडेलसह एकूण ७ खलाशी उपस्थित होते. नौका ताब्यात घेऊन ती देवगड बंदरात सुरक्षितपणे आणण्यात आली आहे. नौकेवर आढळून आलेल्या मासळीची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. न्यायालयीन सुनावणीनंतर नौकामालक व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
पंधरा दिवसांतील सलग दुसरी मोठी कारवाई
ही कारवाई किरण वाघमारे, अंमलबजावणी अधिकारी तथा सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, देवगड) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. त्यांना देवगड पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी फरांदे तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक टुकरुल, खवळे, फाटक, बांधकर, कुबल, सावजी यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. ही कारवाई सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखालील होती. गेल्या १५ दिवसांतील ही परप्रांतीय नौकेवर झालेली दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कठोर कारवाई करून मत्स्य व्यवसाय विभागाने आपली सक्षमता दाखवून दिली आहे.