Sindhudurg: अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या चौघांवर कारवाई, ९० हजाराचा मुद्देमाल जप्त
By सुधीर राणे | Updated: March 7, 2025 18:10 IST2025-03-07T18:09:53+5:302025-03-07T18:10:41+5:30
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचा दणका

संग्रहित छाया
कणकवली: कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक, गावठणवाडी येथे अवैधरित्या गांजाचे सेवन करताना आढळून आलेल्या चार जणांवर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई केली. त्या चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील ९० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई काल, गुरुवारी करण्यात आली.
अकबर नुरमहमद पटेल (हरकुळ बुद्रुक, गावठणवाडी), तुषार रावसाहेब करांडे (रा. कलमठ, बिडयेवाडी), प्रथमेश गणपत घाडीगावकर( रा. मठबुद्रुक, घाडीवाडी), भुषण मंगेश लाड (रा. भवानी अपार्टमेंट, नाथपैनगर, कणकवली) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंमली पदार्थ सेवन, वाहतूक, साठवणूक, विक्री, परराज्यातून जिल्ह्यात होणारी तस्करी रोखण्यासाठी जिल्हास्तरावर अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच पोलिस ठाणेस्तरावरही कारवाईसाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास हरकुळ बुद्रुक, गावठणवाडी, येथे काही व्यक्ती गांजाचे सेवन करीत असल्याची माहिती मिळाली.
यामाहितीवरुन पथकाने कारवाई केली असता हरकुळ बुद्रुक, गावठणवाडी येथे अकबर पटेल, तुषार करांडे, प्रथमेश घाडीगावकर, भुषण लाड हे अंमली पदार्थांचे सेवन करताना ताब्यात घेण्यात आले. पोलिस हवालदार किरण देसाई यांच्या तक्रारीवरुन कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून दोन चिलीम, लायटर, मोबाईल व एक दुचाकी असा ९० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, यांचे सुचनेप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक, समीर भोसले,पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार डॉमनिक डिसोझा, सदानंद राणे, प्रकाश कदम, आशिष गंगावणे व किरण देसाई यांच्या पथकाने केली. दरम्यान, या चौघा संशयित आरोपींना गांजा कोठे मिळाला याबाबत पोलिस तपास करीत आहेत.