Sindhudurg: पोलिसावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास, कोकिसरे येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 14:05 IST2025-09-27T14:05:12+5:302025-09-27T14:05:31+5:30
कणकवली : वैभववाडी पोलिस ठाण्यात आलेला डायल ११२ चा कॉल अटेंड करण्यासाठी पोलिस कर्मचारी कोकिसरे-नारकरवाडी येथे गेले असता आरोपी ...

Sindhudurg: पोलिसावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास, कोकिसरे येथील घटना
कणकवली : वैभववाडी पोलिस ठाण्यात आलेला डायल ११२ चा कॉल अटेंड करण्यासाठी पोलिस कर्मचारी कोकिसरे-नारकरवाडी येथे गेले असता आरोपी राजरत्न अंकुश देवकर (वय ३२, रा. कोकिसरे-नारकरवाडी) याने पोलिसांना शिवीगाळ करत सरकारी कामकाजात अडथळा आणून पोलिस नाईक रमेश नारनवरे यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्यात आरोपी राजरत्न देवकर याला शुक्रवारी सिंधुदुर्गचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर देशपांडे यांनी भा.दं.वि. ३०७, ३५३, ३३२ कलमांखाली दोषी धरत १० वर्षे सश्रम कारावासाची आणि वेगवेगळ्या कलमांन्वये १८ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
कोकिसरे-नारकरवाडी येथील कुमार स्वामी यांच्या घरी अंकुश देवकर हे सेवानिवृत्त वायरमन त्यांची पत्नी व मुलगा राजरत्न यांच्यासह भाड्याने राहत होते. राजरत्न हा आई-वडिलांसोबत क्षुल्लक कारणावरून भांडण करत असे. ९ एप्रिल २०२२ रोजी त्याने आई-वडिलांसोबत भांडण केले होते. वडिलांना त्याने मारहाणही केली होती. त्याला आवरणे अवघड झाल्याने त्याच्या आईवडिलांनी मनोरुग्ण रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलवली होती. मात्र, तो रुग्णवाहिकेमध्ये बसण्यास तयार होत नसल्याने घरमालक कुमार स्वामी यांनी याबाबत वैभववाडी पोलिसांना ११२ वर डायल करून त्याबाबतची माहिती दिली.
त्यानंतर वैभववाडी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार शैलेश कांबळे, पोलिस नाईक रमेश नारनवर, पोलिस कॉन्स्टेबल कृष्णात पडवळ, हरिश्चंद्र जायभाय असे शासकीय वाहनाने कोकिसरे, नारकरवाडी येथे पोहोचले. त्यांनी राजरत्न याला समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पोलिसांना बघून तो घरात गेला व घराची कडी आतून लावून घेतली. दोन्ही हातांमध्ये चाकू घेऊन ‘तुम्ही आमच्या भानगडीत कसे पडता’ असे पोलिसांना उद्देशून पोलिस कॉन्स्टेबल पडवळ यांच्या अंगावर आला. मात्र, त्यांनी पाठीमागे उडी मारली. त्याचवेळी त्याने बाजूस उभे असलेले पोलिस नाईक नारनवरे यांच्या अंगावर उडी मारली. त्यामुळे ते दोघेही खाली पडले.
नारनवरे यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत राजरत्न याने नारनवरे यांच्यावर पाठीत चाकूने दोन वार करून जखमी केले. नारनवरे यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे दाखल केले. पाठीवर चाकूने केलेले वार खोलवर असल्यामुळे अधिक उपचारासाठी त्यांना आधी ओरोस व नंतर पडवे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत पोलिस कृष्णात पडवळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राजरत्न अंकुश देवकर याच्यावर वैभववाडी पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा नोंद केला होता.
न्यायालयातसिंधुदुर्गचे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी आरोपीचा बचाव खोडून काढत वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे देऊन युक्तिवाद केला. शुक्रवारी सत्र न्यायालयाने आरोपी राजरत्न देवकर याला दोषी धरून १० वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आणि त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली. या गुन्ह्याचे तपासकाम पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देसाई यांनी केले होते.