कणकवली : लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम करून घरी परतताना डामरे ते फोंडा रस्त्यावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याकडेच्या निसाला धडकून झालेल्या अपघातात तरुण ठार झाला. पांडुरंग शिवाजी राणे (वय ३५, रा. वाघेरी, लिंगेश्वरवाडी) असे मृताचे नाव आहे. हा अपघात बुधवारी रात्री ११:१५ वाजण्याच्या सुमारास झाला.पांडुरंग राणे हा तरुण बुधवारी रात्री डामरे येथील नातेवाइक प्रकाश सावंत यांच्या मुलीच्या लग्नाच्या हळदीला गेला होता. हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर रात्री ११:०० वाजण्याच्या सुमारास तो वाघेरी येथे दुचाकीवरून घरी निघाला होता. अन्य काहीजण त्याच्यासोबत होते. पांडुरंग हा घरी जात असताना डामरे ते फोंडा रस्त्यावरील सापळे बागनजीक तो त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे तो तेथील रस्त्याच्या बाजूला असलेल्या निसाला जाऊन जोरात आदळला तसेच शेजारील गटारात पडला. या अपघाताची माहिती मिळताच डामरेचे पोलिस पाटील विश्वनाथ सावंत हे अपघातस्थळी दाखल झाले. त्यावेळी पांडुरंग राणे हा गटारात गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पांडुरंग याला तपासून तो मृत झाल्याचे घोषित केले. पांडुरंग राणे याच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.
हळदीचा कार्यक्रम आटोपून परतताना अपघात, तरुण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 13:46 IST