Sindhudurg: विसर्जन स्थळाची स्वच्छता करताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, उपसरपंच गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:30 IST2025-09-02T12:27:17+5:302025-09-02T12:30:30+5:30
जखमी उपसरपंचाना अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले

Sindhudurg: विसर्जन स्थळाची स्वच्छता करताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, उपसरपंच गंभीर जखमी
दोडामार्ग : सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन मंगळवारी असल्याने विसर्जन स्थळाची स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना खोक्रल येथे सोमवारी सायंकाळी घडली.
सूर्याजी साबाजी कुबल (वय २५), असे मृत युवकाचे नाव आहे. त्याच्यासोबत असलेले गावचे उपसरपंच भरत लक्ष्मण गवस (३२) हे जखमी झाले आहे. त्यांना गोव्यातील म्हापसा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन असल्याने गावातील विसर्जन स्थळाची स्वच्छता करण्यासाठी सूर्याजी कुबल व गावचे उपसरपंच भरत गवस हे दोघे गेले होते. साफसफाई करत असताना तेथील विद्युत वाहिन्यांना सूर्याजी कुबल याचा स्पर्श झाल्याने त्याला जोराचा झटका बसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेल्या उपसरपंच भरत गवस यांना ही त्याचवेळी विजेचा धक्का लागला; परंतु ते बाजूला फेकले गेले.
त्यांनी आरडाओरड केल्याने जवळील स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यांना तत्काळ खासगी वाहनाने साटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तत्पूर्वी सूर्याजी याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी स्पष्ट केले. गवस यांना अधिक उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने आझिलो गोवा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.