सिंधुदुर्ग हादरला; स्टोन क्रशरवरील कामगाराने मुकादमासह एकाचा केला खून; मृत, संशयित नाशिकचे

By सुधीर राणे | Updated: May 2, 2025 12:29 IST2025-05-02T12:27:39+5:302025-05-02T12:29:44+5:30

प्रकाश काळे  वैभववाडी ( सिंधुदुर्ग ): नाधवडे येथे स्टोन क्रशरवर काम करणाऱ्या एका कामगाराने मुकादम आणि सहकारी कामगाराचा निर्दयपणे ...

A worker working on a stone crusher in Nadhavade Sindhudurg murdered Mukadam and a fellow worker | सिंधुदुर्ग हादरला; स्टोन क्रशरवरील कामगाराने मुकादमासह एकाचा केला खून; मृत, संशयित नाशिकचे

सिंधुदुर्ग हादरला; स्टोन क्रशरवरील कामगाराने मुकादमासह एकाचा केला खून; मृत, संशयित नाशिकचे

प्रकाश काळे 

वैभववाडी (सिंधुदुर्ग): नाधवडे येथे स्टोन क्रशरवर काम करणाऱ्या एका कामगाराने मुकादम आणि सहकारी कामगाराचा निर्दयपणे खून केला. धनेश्वर सत्यनारायण चौधरी (वय ६६) आणि मनोज सिंग (३०) अशी मृतांची नावे आहेत. दोन्ही मृत व संशयित आरोपी हे नाशिक जिल्ह्यातील असून पोलिसांनी संजय बाबुराव लोखंडे (३८) याला ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी (दि.३०) घडली. 

तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गापासून आतमध्ये नाधवडे येथे स्टोन क्रशर आहे. या क्रशरवर धनेश्वर चौधरी हे मुकादम म्हणून काम करीत होते. क्रशरला कामगार पुरविण्याचा ठेका त्यांच्याकडे होता. क्रशरवर सात कामगार होते. या कामगारांना राहण्यासाठी शेड उभारण्यात आलेली आहे. 

दरम्यान बुधवारी सायंकाळी संशयित आरोपी संजय लोखंडे आणि काही कामगारांमध्ये किरकोळ वाद झाले होते. बऱ्याचदा तो कामगारांशी वेगवेगळ्या कारणांवरुन वाद करायचा. बुधवारी वादानंतर सर्व कामगार आपआपल्या खोल्यांमध्ये गेले. रात्रीच्या सुमारास मुकादम धनेश्वर चौधरी राहत असलेल्या खोलीतून बाजुच्या खोलीतील कामगारांना झटापटीचा आवाज आला. त्यामुळे ते उठुन धनेश्वरच्या खोलीकडे गेले तेव्हा त्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. दोन कामगारांनी खोलीचा दरवाजा तोडुन खोलीत प्रवेश केला असता संशयित आरोपी संजय मुकादम धनेश्वर यांच्यावर बसुन चाकुने वार करीत होता. कामगारांना पाहून तो पळून जाण्याचा प्रयत्न करताना कामगारांनी त्याला एका खोलीत ढकलून दरवाजा बंद केला. 

त्यानतंर मनोज सिंग कुठे न दिसल्यामुळे कामगारांनी त्याला फोन केला. तेव्हा तेथून २०० मीटर अतंरावर त्याचा मोबाईल वाजला. त्यामुळे तिकडे जाऊन पाहीले तर मनोजही मृतावस्थेत आढळला. त्याच्या अंगावर धारदार हत्याराच्या जखमा कामगारांना दिसल्या.

या घटनेची माहिती त्या कामगारांनी पोलिसांना दिल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्यासह पोलिस पथक  घटनास्थळी पोहोचले. संशयित संजय लोखंडे याला त्यांनी ताब्यात घेतले. दरम्यान या हत्याकांडाने जिल्हा हादरुन गेला आहे. हत्याकांडाची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आडाव, स्थानिक गुन्हा शाखेचे पथक, श्वानपथक, रत्नागिरी येथील प्रयोगशाळा तज्ञ, ठसे तज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: A worker working on a stone crusher in Nadhavade Sindhudurg murdered Mukadam and a fellow worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.