"दिलेला शब्द म्हणजे बंदुकीची गोळी; १९ फेब्रुवारी २०२७ ला मराठा भवनाचे उद्घाटन करणार - नितेश राणे
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 19, 2026 14:47 IST2026-02-19T14:46:05+5:302026-02-19T14:47:19+5:30
केवळ घोषणा नाही, तर प्रत्यक्ष कृतीवर आमचा विश्वास

"दिलेला शब्द म्हणजे बंदुकीची गोळी; १९ फेब्रुवारी २०२७ ला मराठा भवनाचे उद्घाटन करणार - नितेश राणे
कणकवली: "मी मराठा समाजाला शब्द दिला होता की, तुमच्या हक्काचे सांस्कृतिक भवन उभे करेन. राणे कुटुंबाचा शब्द म्हणजे बंदुकीतील गोळी असते, तो कधीही चुकत नाही. आज या वास्तूचे भूमिपूजन झाले असून, पुढच्या वर्षी १९ फेब्रुवारी २०२७ रोजी मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांच्या उपस्थितीत या वास्तूचे दिमाखात उद्घाटन होईल," असा ठाम विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
कणकवली येथे जिल्हा नियोजनाच्या ८ कोटी रुपयांच्या निधीतून साकारल्या जाणाऱ्या मराठा सांस्कृतिक भवन, कलादालन व उद्यान उभारणीच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.
शब्दाला जागणारे सरकार
"पालकमंत्री झाल्यानंतरचे हे माझे पहिले मोठे काम आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी समाजातील बांधव मला भेटले होते, त्यांनी हक्काच्या वास्तूची मागणी केली होती. आज त्या मागणीची पूर्तता करताना मला अभिमान वाटतोय. केवळ घोषणा नाही, तर प्रत्यक्ष कृतीवर आमचा विश्वास आहे."
राजकारणापलीकडचे नाते
"सिंधुदुर्ग आणि राणे कुटुंबाचे नाते केवळ निवडणुकांपुरते नाही. २०१४ ते २०१९ या काळात आम्ही सत्तेत नव्हतो, पराभूत होतो, तरीही जिल्ह्यासाठी मेडिकल कॉलेज उभे केले. त्या विचारातूनच आम्ही घडलो आहोत. ही वास्तू उभी करताना सकल मराठा समाजाने आपल्या सूचना द्याव्यात, कारण ही वास्तू सांभाळण्याची सामूहिक जबाबदारी तुमची आणि आमची आहे."
इतिहासाची जपवणूक आणि तुलना
"शिवरायांनी आपल्याला अन्याय आणि दडपशाहीविरुद्ध लढायला शिकवले. त्यांनी स्वराज्य स्थापन केले आणि हिंदू धर्माचे रक्षण केले. आज काही लोक महाराजांची तुलना टिपू सुलतानाशी करतात, पण ती कधीच होऊ शकत नाही. ज्याने ८००० हिंदूंची कत्तल केली, तो टिपू महाराजांच्या नखाचीही सर धरू शकत नाही. महाराजांनी कधीही कोणत्याही मशिदीकडे वाकड्या नजरेने पाहिले नाही, त्यांनी न्यायाचे राज्य चालवले."
प्रशासनाची गती आणि पारदर्शकता
"स्वराज्यात जसे पारदर्शक प्रशासन होते, तसेच आमचे प्रशासन गतीने काम करत आहे. जिल्हाधिकारी आणि सर्व यंत्रणांनी हे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तुमचा सेवक म्हणून मी जिल्ह्याच्या सुख-समृद्धीसाठी आणि कोणत्याही संकटात सदैव तत्पर असेन."
प्रशासकीय ग्वाही
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले की, "शासनाच्या वतीने आम्ही पूर्ण ताकदीने हे सांस्कृतिक भवनाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत."
या सोहळ्याला पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, प्रांताधिकारी जगदीश कातकर, सतीश सावंत, संदेश सावंत, अबिद नाईक, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, ॲड. उमेश सावंत, एस. टी. सावंत, मनोज रावराणे, सावी लोके, मुख्याधिकारी गौरी पाटील आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.