Sindhudurg: कॅनमधील पेट्रोलचा भडका उडाला, कपड्याच्या दुकानाला आग लागून लाखोंचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 13:17 IST2025-08-29T13:17:15+5:302025-08-29T13:17:54+5:30
लगतच्या दुकानांनाही झळ

Sindhudurg: कॅनमधील पेट्रोलचा भडका उडाला, कपड्याच्या दुकानाला आग लागून लाखोंचे नुकसान
दोडामार्ग : कॅनमधील पेट्रोलचा भडका उडाल्याने दोडामार्ग शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील ‘बॉम्बे टेक्स्टाइल’ या कपड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याने शहरात एकच खळबळ उडाली. ही दुर्घटना गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. नगरपंचायतीची अग्निशमन यंत्रणा आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवणे शक्य झाले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. मात्र, तरीही लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
दोडामार्ग बाजारपेठेत गुरुवारी सकाळच्या वेळेस दुकाने उघडण्याची वेळ असल्याने बाजारपेठेत फारशी गर्दी नव्हती. मात्र, एक व्यक्ती आपल्या चारचाकी वाहनात प्लास्टिकच्या कॅनमधून पेट्रोल घेऊन जात असताना त्या पेट्रोलने पेट घेतला. लागलीच त्याने ती कॅन बाहेर फेकली. मात्र, त्याचा भडका उडाल्याने लगतच्या दुकानाला आग लागली.
बॉम्बे टेक्स्टाइल शोरूमच्या दुमजली असलेल्या इमारतीमधून धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याचे लक्षात येताच आजूबाजूचे नागरिक व व्यापारी धाव घेत तेथे पोहोचले. काही क्षणातच लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. शोरूमचा दर्शनी भाग पूर्णपणे जळून काळा झाला, तर आतील भागात धुराचे प्रमाण प्रचंड वाढल्याने आग अधिक फैलावण्याची भीती व्यक्त केली जात होती.
या घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग नगरपंचायतीच्या अग्निशमन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दाखल झालेल्या बंब व कर्मचाऱ्यांच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. अन्यथा ही आग संपूर्ण बाजारपेठ गिळंकृत करू शकली असती. अग्निशमन यंत्रणेच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
लगतच्या दुकानांनाही झळ
या आगीत ‘बॉम्बे टेक्स्टाइल’ शोरूमचे मुख्य नुकसान झाले असले, तरी त्याच्या समोरील व आजूबाजूच्या काही दुकानांनाही आगीची झळ बसली. शोरूमसमोर असलेल्या एका दुकानातील प्लास्टिकच्या ताडपत्रीला आग लागून ती जळून खाक झाली. तसेच लगत असलेल्या दोन दुकानांचे नामफलकदेखील आगीत जळून गेले. मात्र, या दुकानदारांनी वेळीच सावधगिरी बाळगल्याने मोठा अनर्थ टळला.
शोरुमच्या दर्शनी भागाचे नुकसान
शोरूमच्या आतमधील कपड्यांचा साठा मोठ्या प्रमाणात असून, सुदैवाने आग त्यापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे वस्तूंचे फारसे नुकसान झाले नसले, तरीही दर्शनी भागाचे नुकसान, धुरामुळे झालेला त्रास व नामफलकांचे नुकसान यामुळे आर्थिक फटका बसला आहे. यावेळी पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे व पोलिस उपनिरीक्षक आशिष भगत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.