Sindhudurg: अज्ञातवासात गेलेला ‘तो’ हत्तींचा कळप परतला, भातकापणीच्या तोंडावर शेतकरी चिंतातुर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:49 IST2025-11-10T12:48:55+5:302025-11-10T12:49:11+5:30
ओंकार हत्तीवर लक्ष ठेवून असलेल्या वन विभागाची या परतलेल्या हत्तींमुळे झोप उडणार

Sindhudurg: अज्ञातवासात गेलेला ‘तो’ हत्तींचा कळप परतला, भातकापणीच्या तोंडावर शेतकरी चिंतातुर!
दोडामार्ग : गेल्या महिन्याभरापासून अज्ञातवासात गेलेला चार हत्तींचा कळप पुन्हा तिलारी खोऱ्यात परतला आहे. मुळस-हेवाळे परिसरात सध्या त्याचा वावर आहे. ऐन भातकापणीच्या हंगामात हा कळप परत आल्याने शेतकऱ्यांची तर चिंता वाढली आहेच, पण गेल्या काही दिवसांपासून इन्सुली परिसरात फिरणाऱ्या ओंकार हत्तीवर लक्ष ठेवून असलेल्या वन विभागाची या परतलेल्या हत्तींमुळे झोप उडणार आहे.
दोडामार्ग तालुक्यात ओंकार हत्ती सोडून आणखी पाच हत्तींचा कळप वास्तव्यास होता. त्यांपैकी बाहुबली टस्कर घाटमाथ्यावर परत गेला होता. तर, ओंकार हत्ती गोव्याची सफर करून मडूरामार्गे बांदा-इन्सुली परिसरात दाखल झाला. दरम्यानच्या काळात उरलेल्या चार हत्तींच्या कळपाने कोलझर-झोळंबे परिसरात केलेल्या नुकसानीमुळे तिथला बागायतदार कोलमडून गेला होता.
मात्र, महिनाभरापूर्वी हा चार हत्तींचा कळप अचानकपणे अज्ञातवासात गेला. तो कुठे गेला? याचा मागमूस वन विभागालाही नव्हता. नुकसानसत्र थांबल्याने शेतकरी खुश होता तर इन्सुली परिसरात फिरणाऱ्या ओंकार हत्तीवर लक्ष केंद्रित करता येणार असल्याने वन विभागाला थोडासा दिलासा मिळाला होता. पण, आता पुन्हा महिनाभराच्या विश्रांतीनंतर हा कळप परतल्याने वन विभागाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
तिलारी खोऱ्यात चार हत्तींचा कळप जरी परतला असला तरी त्या कळपाला भातशेती, बागायती किंवा लोकवस्तीपासून दूर ठेवण्याकरिता हाकारी टीम तैनात ठेवण्यात आली आहे. आपल्याकडे ५० कर्मचाऱ्यांची टीम असून, त्यातील काही जण ओंकारच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेले आहेत, तर उरलेले हेवाळे परिसरात लक्ष देतील. - सुहास पाटील, प्रभारी वनक्षेत्रपाल, दोडामार्ग
गेला महिनाभर या चार हत्तींचा कळप अज्ञातवासात होता. मात्र, ऐन भातकापणीच्या हंगामात हा कळप परत आल्याने चिंता वाढली आहे. शेतकरी आधीच अवकाळी पावसामुळे नुकसानीत आहे. त्यात हत्तींचे संकट असल्याने या कळपाकडून कसे नुकसान होणार नाही याकडे वन विभागाने पाहावे व तसे नियोजन करावे. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. - तेजस देसाई, उपसरपंच केर - भेकुर्ली ग्रामपंचायत