कणकवलीत उभारणार भव्य 'मराठा सांस्कृतिक भवन'; शिवजयंतीदिनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमीपूजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 13:02 IST2026-02-19T13:02:14+5:302026-02-19T13:02:49+5:30
८ कोटींच्या निधीतून कायापालट होणार!

कणकवलीत उभारणार भव्य 'मराठा सांस्कृतिक भवन'; शिवजयंतीदिनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमीपूजन
कणकवली : शिवजयंतीचे औचित्य साधून कणकवली शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या मराठा सांस्कृतिक भवन, कलादालन व उद्यानाच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते दिमाखात पार पडले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, हे काम वर्षभरात पूर्ण करण्याचा शब्द प्रशासनाने दिला आहे.
या सोहळ्याला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, प्रांताधिकारी जगदीश कातकर, सतीश सावंत, संदेश सावंत, अबिद नाईक, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, एड. उमेश सावंत, मराठा समाजाचे नेते एस. टी. सावंत, मनोज रावराणे, सावी लोके, मुख्याधिकारी गौरी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशासकीय यंत्रणा कामाला लागणार
कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आश्वासित केले की, शासनाच्या वतीने या सांस्कृतिक भवनाचे काम अत्यंत दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पुढील वर्षभरात हे भवन उभे राहील, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील.
कलेचा आणि संस्कृतीचा सन्मान
यावेळी 'अक्षरसिंधू कलामंच'च्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मराठा समाजाच्या वतीने भाई परब यांनी आपल्या भावना व्यक्त करताना या प्रकल्पाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजयकुमार सर्वगोड यांनी केले.