Sindhudurg: आश्चर्यजनक! कंटेनरमधून उडी मारली अन् वीजतारेवर अडकली, तरीही बकरी जिवंत राहिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 12:01 IST2025-07-10T12:00:38+5:302025-07-10T12:01:15+5:30
गोव्याहून गुजरातकडे जाणाऱ्या बकऱ्या नेणाऱ्या कंटेनरमधील प्रकार

Sindhudurg: आश्चर्यजनक! कंटेनरमधून उडी मारली अन् वीजतारेवर अडकली, तरीही बकरी जिवंत राहिली
सावंतवाडी: ‘देव बलवत्तर असेल तर काहीही होऊ शकते, एखाद्याचा गेलेला जीवही परत येऊ शकतो,’ याचा प्रत्यय बुधवारी सावंतवाडीत आला. गोव्याहून गुजरातकडे बकऱ्या नेणाऱ्या कंटेनरमधून एका बकरीने उडी मारली आणि ती प्रवाहीत विद्युत वाहिनीवर अडकली.
काही जणांना वाटले की बकरी मृत पावली आहे, पण देव बलवत्तर असल्यामुळे ती बकरी विद्युत प्रवाहात जिवंत राहिली, ही आश्चर्यजनक घटना म्हणावी लागेल. अखेर ती बकरी स्थानिकांच्या मदतीने काढण्यात आली व नंतर ती सुखरूप मार्गस्थ झाली. हा प्रकार उपरलकर देवस्थानाजवळ सावंतवाडी - आंबोली रस्त्यावर घडला.
गोवा येथील बकऱ्यांचे काही व्यावसायिक चार ते पाच मोठ्या कंटेनरमधून बकऱ्या घेऊन गुजरातच्या दिशेने जात होते. या कंटेनरमधील एका बकरीने कंटेनरमधून उडी मारली आणि ती प्रवाहित विद्युत वाहिनीवर अडकली. तिचे शिंग विद्युत वाहिनीमध्ये अडकले आणि ती तशीच उशिरापर्यंत लोंबकळत होती.
..असे सुरू झाले बचावकार्य
काही जणांना वाटले की, बकरी विद्युत वाहिनीत अडकून मृत्यू पावली आहे. मात्र, काही वेळाने बकरीची हालचाल दिसून आली आणि सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तेथून जाणाऱ्या प्रवाशांनी मदतकार्य सुरू केले. या बकरीला वीज वाहिनीवर लोंबकळताना पाहून काही लोकांनी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फोन केला. तातडीने वीज पुरवठा खंडित करण्यात आला. वीज कंपनीचे कर्मचारी तिथे आले. सर्वांनी मिळून लाकडाच्या मदतीने बकरीला प्रवाहित विद्युत वाहिनीमधून सुरक्षितपणे काढण्यात आले. त्यानंतर संबंधित ड्रायव्हर बकरीसह तिथून निघून गेला.
बघ्यांची मोठी गर्दी
हा प्रकार पाहण्यासाठी स्थानिकांनी आणि महामार्गावरील प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. बकरी खाली काढल्यानंतर चालक तिला घेऊन तिथून निघून गेला.