Sindhudurg: मित्रानेच केला मित्राचा घात.!, दारूच्या नशेत घडलेल्या खुनाच्या घटनेने साटेली-भेडशीत खळबळ
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 22, 2024 18:39 IST2024-05-22T18:25:29+5:302024-05-22T18:39:37+5:30
वैभव साळकर दोडामार्ग : दारूच्या नशेत अंगात राक्षस संचारलेल्या मित्राने शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दुसऱ्या मित्राच्या डोक्यावर लाकडी बेंचच्या रिपने ...

Sindhudurg: मित्रानेच केला मित्राचा घात.!, दारूच्या नशेत घडलेल्या खुनाच्या घटनेने साटेली-भेडशीत खळबळ
वैभव साळकर
दोडामार्ग : दारूच्या नशेत अंगात राक्षस संचारलेल्या मित्राने शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दुसऱ्या मित्राच्या डोक्यावर लाकडी बेंचच्या रिपने प्रहार करून त्याचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार साटेली-भेडशी वरचा बाजार येथे बुधवारी पहाटे उघडकीस आला. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी मित्रास एका तासाच्या आत गजाआड केले. मृताचे नाव अमर मनोहर देशमाने ( वय ५५, रा. कोयनानगर सातारा, सध्या रा. साटेली-भेडशी) असे असून, संशयित आरोपी समीर पेडणेकर ( वय ४०, रा. झरे बांबर, कजुळवाडी) याला अटक केली आहे.
दारूच्या व्यसनापाेटी अनेकांचे संसार धुळीस मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. दारूमुळे गुन्हेगारी जन्माला आल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. अशीच एक घटना बुधवारी पहाटे साटेली - भेडशी बाजारपेठेत उघडकीस आली आणि एकच खळबळ उडाली. वरचा बाजार येथील वामन संकुलाच्या आवारात एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पोलिस पाटील प्रकाश देसाई यांच्या निदर्शनास आले. त्यांनी बारकाईने निरीक्षण केले असता तो त्याच परिसरात फिरणारा अमर देशमाने असल्याचे लक्षात आले. लागलीच त्यांनी दोडामार्ग पोलिसांना याबाबत माहिती दिली.
खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी लागलीच घटनास्थळी येऊन मृतदेहाचा पंचनामा केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवली. यादरम्यान मृत अमर सोबत मंगळवारी रात्री झरे बांबर कजुळवाडी येथील समीर पेडणेकर हा होता, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तातडीने त्याचा शोध घेतला असता तो खालचा बाजार येथे असल्याचे समजले. पोलिसांनी तेथून त्याच्या मुसक्या आवळत त्याला घटनास्थळी आणले. खुनाबाबत विचारणा केली मात्र समीरने सुरुवातीला आपल्याला काही माहीत नसल्याचा आव आणला. पण, पोलिसांनी आपला पोलिसी हिसका दाखविताच त्याने गुन्हा कबूल केला आणि पोपटासारखा बोलत सगळा घटनाक्रमच पोलिसांसमोर उलगडला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
आईवरून शिवी दिल्याने मारहाण
अमर आणि संशयित आरोपी समीर हे दोघेही मित्र होते. मिळेल ते काम करायचे आणि उदरनिर्वाह चालवायचे असा त्यांचा दिनक्रम असायचा. अमर हा मूळ सातारा जिल्ह्यातील असला तरी तो गेल्या अनेक वर्षांपासून तिलारी परिसरातच राहायचा. सुरुवातीला तिलारी प्रकल्पावरील एका खासगी कंपनीत तो चालक म्हणून काम करायचा. मात्र, प्रकल्प बंद पडल्याने तो उदरनिर्वाहासाठी इतर कामे करायचा. समीर आणि त्याची मैत्री कामावरच झाली होती. काही दिवसांपासून ते दोघेही साटेली-भेडशी ग्रामपंचायत नजीकच्या टॉवरजवळ काम करायचे. दारूसाठी ते एकमेकांना कंपनीही द्यायचे. मंगळवारी रात्री दोघेही दारू पित बसले होते. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार त्याने स्वतःच अमरला दारू पाजली होती. काही पैसेही दिले मात्र दारूच्या नशेत असलेल्या अमरने समीरलाच आईवरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतापलेल्या समीरने त्याच्या कानशिलात लगावली. पण, शिवीगाळ करणे अमरने सोडले नाही. परिणामी रागाने लालबुंद झालेल्या आणि डोक्यातील दारूच्या नशेने अंगात राक्षस संचारलेल्या समीरने जवळच असलेल्या लाकडी बेंचच्या रिपने त्याच्या डोक्यावर प्रहार केला. त्यात रक्तबंबाळ अवस्थेत तो खाली पडला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला.
खून केल्यानंतर समीरने गाठले प्राथमिक आरोग्य केंद्र ?
संशयित आरोपी समीरने दिलेल्या माहितीनुसार त्याने अमरचा खून केल्यावर तो भानावर आला आणि त्याने थेट साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. त्याठिकाणी जाऊन त्याने आपल्या हातून घडलेला प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो दारूच्या नशेत असल्याने त्याच्याकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही आणि त्याला तेथून हाकलून देण्यात आले. त्यानंतर बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
संशयिताच्या वडिलांवरही आहे खुनाचा गुन्हा
संशयित समीरचे वडीलही खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत आहेत. त्यांनी चार वर्षांपूर्वी स्वतःच्या पत्नीचा म्हणजेच संशयिताच्या आईचा खून केला होता.