Sindhudurg: जादा परताव्याच्या आमिषाने ७८ लाखांची फसवणूक, एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी
By सुधीर राणे | Updated: April 10, 2025 17:44 IST2025-04-10T17:43:02+5:302025-04-10T17:44:56+5:30
कणकवली : शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून दरमहा १० ते १२ टक्के व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या ...

Sindhudurg: जादा परताव्याच्या आमिषाने ७८ लाखांची फसवणूक, एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी
कणकवली : शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून दरमहा १० ते १२ टक्के व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे, खांबलवाडी येथील स्वप्निल शांताराम बेळेकर, विनया स्वप्निल बेळेकर या पती-पत्नी विरोधात कणकवली पोलिस ठाण्यात सर्वेश हरी भिसे यांच्यानंतर आणखी ६ जणांनी एकूण ७८ लाख ५ हजार रुपयांची आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल करत एम. पी. आय. डी. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या बेळेकर दांपत्याकडून आणखी कोणाची आर्थिक फसवणूक झाली असल्यास तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी केले आहे.
बेळेकर यांच्याकडून आर्थिक फसवणूक झालेल्यांमध्ये संगीता अच्युतराव वणवे यांची ५१ लाख ५० हजार, अरुण राधाकृष्ण इंगळे यांची १ लाख, गौतम विठ्ठल कासले यांची ३ लाख, महानंदा देऊ पवार यांची ६ लाख २० हजार, धोंडू विलास बिडये यांची ११ लाख ५५ हजार, सुरेखा पिराजी कांबळे यांची ५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे कणकवली पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे. स्वप्निल आणि विनया या पती-पत्नीने आपल्याला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचे या तक्रार अर्जात नमूद केले असून स्वप्निल बेळेकर आणि त्याची पत्नी विनया बेळेकर विरोधात महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण कायदा कलम ३, ४ तसेच बी एन एस कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.
या तक्रार अर्जाची प्रत माहितीसाठी उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच पोलिस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांना पाठवली आहे. गुन्ह्यात अटकेत असलेला स्वप्निल याला सुनावलेल्या पोलिस कोठडीची मुदत ९ एप्रिल रोजी संपली. त्यामुळे त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली आहे.