फोंडाघाट तपासणी नाक्यावर कारमध्ये सापडली ३८ लाखाची रोकड, कोल्हापुरातील व्यावसायिकाची असल्याची माहिती
By सुधीर राणे | Updated: June 20, 2024 13:36 IST2024-06-20T13:35:11+5:302024-06-20T13:36:03+5:30
कणकवली : फोंडाघाट पोलिस तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या पोलिसांकडून बुधवारी रात्री वाहनांची तपासणी सुरू असताना कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका ...

फोंडाघाट तपासणी नाक्यावर कारमध्ये सापडली ३८ लाखाची रोकड, कोल्हापुरातील व्यावसायिकाची असल्याची माहिती
कणकवली : फोंडाघाट पोलिस तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या पोलिसांकडून बुधवारी रात्री वाहनांची तपासणी सुरू असताना कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका कार (क्रमांक एम.एच.०९एफ.बी.४०७८) मध्ये तब्बल ३८लाख ६७ हजार ९०० रुपयांची रोकड सापडल्याने एकच खळबळ उडाली. ही रोकड घेऊन जाणाऱ्या दोघांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी विसंगत उत्तरे दिली.
दरम्यान, कोल्हापूर येथील एका व्यावसायिकाची ही रक्कम असल्याची बाब प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काहींना माल दिल्यानंतर वसूल केलेली रक्कम घेऊन ते दोघेजण जात होते. चेक द्वारे पेमेंट न करता कॅश पेमेंट घेऊन अशा प्रकारे जीएसटी चुकवण्याचा हा प्रयत्न असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
फोंडघाट तपासणी नाक्यावर कार्यरत असणारे पोलिस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे व सागर देवार्डेकर यांनी ही कारवाई केली. दरम्यान या कारवाईनंतर घटनेची माहिती वरिष्ठांना देताच पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ व रवींद्र शेगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. प्रक्रियेअंती ती रक्कम महसूल विभागाच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. अधिक तपास सुरू आहे.
नितीन बनसोडे यांच्यासहित पथकाने काही दिवसांपूर्वीच खारेपाटण तपासणी नाक्यावर विनापरवाना बंदुकी सहित शिकाऱ्यांवर कारवाई केली होती. ही कारवाई चर्चेत आली होती. त्यानंतर आता पुन्हा पोलिसांनी केलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.