सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली १७ शाळाबाह्य मुले, शिक्षण विभागाकडून राबविण्यात आली विशेष शोधमोहिम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 19:30 IST2025-08-02T19:30:00+5:302025-08-02T19:30:27+5:30

सर्वांना शालेय प्रवाहात आणले जाणार

17 out of school children found in Sindhudurg district | सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली १७ शाळाबाह्य मुले, शिक्षण विभागाकडून राबविण्यात आली विशेष शोधमोहिम

संग्रहित छाया

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून राबविण्यात आलेल्या विशेष शोधमोहिमेत एकूण १७ शाळाबाह्य मुलांचा शोध लागला आहे. १ जुलैपासून हाती घेण्यात आलेली ही मोहीम १५ जुलैपर्यंत राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला असून, जिल्हाभर राबविण्यात आलेल्या या मोहिमेत १७ मुले शाळाबाह्य आढळली आहेत.

यामध्ये ११ मुले, तर ६ मुलींचा समावेश आहे. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्राथमिक समग्र शिक्षा कार्यक्रमाची तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत ज्ञानरचनावादी शाळा, कृतियुक्त अध्ययन पद्धती, डिजिटल शाळा, आयएसओ मानांकन, मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश, मध्यान्ह भोजन, विविध शिष्यवृत्ती परीक्षांची तयारी, नवोदय परीक्षा तयारी, अशा प्रभावी उपक्रमांची अंमलबजावणी अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांमार्फत शाळांमध्ये सुरू आहे.

मात्र, सरकारच्या अनेक योजना सुरू असतानाही अद्याप काही बालके शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास येत आहेत. अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता शोधमोहीम राबविण्यात आली.
मोहिमेत घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याव्यतिरिक्त बसस्थानक, रेल्वे स्थानक, बाजारपेठ, वीटभट्ट्या, दगडखाणी, कारखाने, स्थलांतरित कुटुंब, जिल्ह्यातील सर्व खेडी, गाव, वाडी, तांडे, पाडे, शेतमळे, जंगल, बालगृह, निरीक्षणगृह, विशेष दत्तक संस्था आदी ठिकाणी जाऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या नोंदी करण्यात आल्या.

शाळाबाह्य मुलांच्या विशेष शोध मोहिमेंतर्गत ६ ते १८ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना शिक्षण प्रवाहात आणणे हा प्रमुख उद्देश आहे .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात १, कुडाळ तालुक्यात १०, तर वेंगुर्ला तालुक्यात ६ मुले शाळाबाह्य मुलांचा समावेश आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

गेल्या वर्षी ६ मुले आढळली होती

गेल्या वर्षी ५ ते २० जुलै २०२४ या कालावधीत राबविण्यात आलेल्या शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेत ६ शाळाबाह्य मुले आढळून आली होती. त्यांना शाळेत दाखल करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले होते.

Web Title: 17 out of school children found in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.