Satara: जमिनीच्या अतिक्रमणावरून दोन गटांत धुमश्चक्री; एकमेकांवर दगडफेक, सात ते आठजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:17 IST2025-02-07T14:17:09+5:302025-02-07T14:17:23+5:30
दहाजण ताब्यात; जमीन अन् जुन्या वादातून मारामारी

Satara: जमिनीच्या अतिक्रमणावरून दोन गटांत धुमश्चक्री; एकमेकांवर दगडफेक, सात ते आठजण जखमी
सातारा : जकातवाडी, ता. सातारा येथे जमिनीच्या अतिक्रमणावरून गुरुवारी दुपारी दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. तसेच एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली. यामध्ये सात ते आठजण जखमी झाले. या घटनेनंतर सातारा तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून १० जणांना ताब्यात घेतले. जकातवाडीत रात्री उशिरा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जकातवाडीमधील गायरान जमिनीवर घरे वसलेली आहेत. १९५५ साली या ठिकाणी ११ घरांना परवानगी देण्यात आली होती. आजपर्यंत कुटुंब वाढत गेल्याने या ठिकाणी आता सुमारे ४६ घरे झालेली आहेत. या परिसरातील काही मुलांचा वर्षापूर्वी गावातील एका कुटुंबाशी वाद झाला होता. हा वाद गेल्या वर्षभर चिघळत आहे. त्यातूनच गायरानावरील अतिक्रमण काढण्यासाठी काही जणांनी लेखी अर्जही केले होते. परंतु, त्यावर मार्ग निघालेला नाही. दुसरीकडे वस्तीतील लोकांनाही अतिक्रमण कायम करून मिळण्यासाठीही प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु, त्याबाबतही निर्णय झालेला नाही.
या वादातून काही दिवसांपूर्वी त्या दोन गटांमध्ये वादही झाला होता. तालुका पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीही दाखल झाल्या होत्या. तेव्हापासून दोन्ही गटांत सातत्याने काही ना काही वाद होत होता. मोबाइलवर एकमेकांच्या विरोधात स्टेटस ठेवणे, धमकी देणे, तक्रारी करणे सुरूच होते. हा वाद चिघळू नये यासाठी पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांनी चार महिन्यांपूर्वी दोन्ही गटांची बैठकही घेतली होती.
दरम्यान, गुरुवारी सकाळी जुना वाद पुन्हा उफाळून आला. सकाळी दूध घालायला गेलेल्या मुलाला मारहाण झाल्याचे निमित्त घडले. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तातडीने जकातवाडी येथे गेले. दोन्ही गटांशी चर्चा सुरू होती. त्याचदरम्यान सुमारे ५० ते ६० युवकांनी दांडकी व शस्त्राच्या साह्याने एकमेकांवर हल्ला केला. यामध्ये वस्तीमधील घरे, गाड्या व पत्र्यावर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे जकातवाडीत मोठा तणाव निर्माण झाला. यामध्ये दोन गाड्या तसेच अन्य साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.