अंगावर शस्त्राचे वार झेलत तरुणांनी रोखला ज्वेलर्सवरील दरोडा, साताऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 12:22 IST2025-08-01T12:21:22+5:302025-08-01T12:22:15+5:30
चोरट्यांना पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन

अंगावर शस्त्राचे वार झेलत तरुणांनी रोखला ज्वेलर्सवरील दरोडा, साताऱ्यातील घटना
सातारा : सातारा शहरात ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या शस्त्रधारी आरोपींना दोन तरुणांनी पकडले. यावेळी आरोपींच्या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला. आरोपींनी धारदार शस्त्राने वार केले. मात्र, तरीसुद्धा तरुणांनी आरोपींना साेडले नाही. नागरिकांच्या मदतीने पकडून दोघा आरोपींना शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले. ही धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे तीन वाजता प्रतापगंज पेठेत घडली.
शुभम दीपक इंगवले (वय २२, रा. किडगाव, ता. सातारा) याच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रतापगंज पेठेत प्रवीण भोसले यांचे केदारनाथ ज्वेलर्स आहे. या दुकानाशेजारी ऋषिकेश तिताडे (वय २५) याचे घर आहे. गुरुवारी पहाटे दोघे संशयित ज्वेलर्सच्या शटरच्या कुलूपाची पट्टी कापत हाेते. त्यांची एक पट्टी कापून झाली होती. दुसरी पट्टी कापत असताना त्याचा आवाज येऊ लागला.
या दुकानासमोर राहात असलेला विशाल बावणे याला आवाजामुळे जाग आली. त्याने बाहेर येऊन पाहिले असता दोघे तरुण ज्वेलर्सचे कुलूप तोडत असल्याचे दिसले. त्याने तत्काळ पहाटे तीनच्या सुमारास ऋषिकेश याला फोन केला. ऋषिकेश झोपेतून उठून खाली आला. त्यावेळी अल्पवयीन मुलाच्या हातात कुकरीसारखे धारदार शस्त्र होते.
ऋषिकेशने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने ऋषिकेशच्या कानावर, गालावर, तसेच मानेवर डाव्या बाजूने वार केले. तसेच संशयितांपैकी दुसरा आरोपी विशाल बावणे याला मारण्यासाठी हातात पोपट पाना घेऊन धावला. याचवेळी इतर नागरिकही आवाजाने तेथे आले.
नागरिकांनी दोघा संशयितांना काठीने अक्षरश: बदडून काढले. त्यानंतर शाहूपुरी पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेतली. जखमी ऋषिकेशला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघेही पहिल्यांदाच रेकाॅर्डवर
नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या संशयित आरोपींकडे पोलिस कसून चाैकशी करत आहेत. दोघेही पहिल्यांदाच पोलिसांच्या रेकाॅर्डवर आले आहेत. त्यामुळे या दोघा संशयितांनी सातारा शहरात आणखी कुठे चोऱ्या केल्या आहेत का, याची कसून चाैकशी पोलिसांकडून केली जात आहे.