Satara Crime: दहावीचे पेपर संपल्यानंतर करणार होते युवकाचा खून, चार अल्पवयीन मुलांसह ५ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 11:49 IST2023-03-23T11:48:57+5:302023-03-23T11:49:24+5:30
..म्हणून पेपर संपल्यानंतर त्याला उचलून न्यायचे आणि कोयत्याने मारण्याचा कट रचल्याची कबुली

Satara Crime: दहावीचे पेपर संपल्यानंतर करणार होते युवकाचा खून, चार अल्पवयीन मुलांसह ५ जणांना अटक
वाई : वेळे, ता. वाई येथे दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन युवकाचा शेवटचा पेपर संपल्यानंतर खून करण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र, पोलिसांना याची कुणकुण लागल्यानंतर तातडीने हालचाल करून खुनाचा कट रचणाऱ्या एका तरुणासह चार अल्पवयीन युवकांना अटक करण्यात आली आहे. वाई शहरात एका चप्पलच्या दुकानात बसून हा कट रचण्यात आला असल्याची माहिती पुढे आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ज्याचा खून करण्यात येणार होता त्या युवकाने एक महिन्यापूर्वी या कटातील अल्पवयीन युवकाला मारहाण केली होती. याचा राग मनात धरून हा कट रचण्यात आला होता. २५ मार्चला युवकाचा दहावीचा शेवटचा पेपर संपल्यानंतर त्याला उचलून न्यायचे आणि कोयत्याने त्याला मारण्याचा कट रचल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या संशयित युवकाने दिली आहे. संशयित युवकांकडून कोयता जप्त करून त्यांच्याविरोधात वाई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांमुळे वाचला जीव
वाई शहरातील मुले वेळे येथील एका अल्पवयीन मुलाचा खून करणार आहेत, अशी माहिती वाई पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने चार अल्पवयीन मुलांसह एका तरुणाला ताब्यात घेतले. वेळीच पोलिसांनी कारवाई केल्याने संबंधित दहावीतील युवकाचा जीव वाचला.