Satara: पाकिस्तानचा ध्वज, भारताविरोधी मजकूर असलेला स्टेटस; वाईतील युवकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 13:08 IST2025-04-26T13:07:44+5:302025-04-26T13:08:06+5:30
वाई : पाकिस्तानचा झेंडा आणि भारतविरोधी मजकूर असलेला स्टेटस मोबाइलवर ठेवल्याप्रकरणी एका तरुणास वाई पोलिसांनी अटक केली. शुभम दशरथ ...

Satara: पाकिस्तानचा ध्वज, भारताविरोधी मजकूर असलेला स्टेटस; वाईतील युवकाला अटक
वाई : पाकिस्तानचा झेंडा आणि भारतविरोधी मजकूर असलेला स्टेटस मोबाइलवर ठेवल्याप्रकरणी एका तरुणास वाई पोलिसांनी अटक केली. शुभम दशरथ कांबळे (रा. जांभळी, ता. वाई) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी संकेत सुरेश चिकणे (रा. सोनगिरवाडी, ता. वाई) यांनी वाई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संशयित शुभम कांबळे याने पाकिस्तानचा झेंडा आणि भारतविरोधी मजकुराचा मोबाइल स्टेटस ठेवला होता. त्याच्या मित्राने गुरुवारी (२४ एप्रिल) सायंकाळी तो स्टेटस पाहिला. याप्रकरणी त्याने वाई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी शुभम कांबळे याच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात संशयिताने मोबाइलवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्याचे आढळून आले.
गुन्हा दाखल केल्यानंतर वाई पोलिसांनी संशयित शुभम कांबळे याला शुक्रवारी दुपारी अटक केली. त्याला वाईच्या प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वाई पोलिस ठाण्याचे हवालदार जितेंद्र शिंदे यांनी दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे अधिक तपास करीत आहेत.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वाई पोलिस प्रशासनाकडून सर्वधर्मीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व उपस्थितांनी या घटनेचा व पहलगाम येथील घटनेचा निषेध केला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचीम, पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, माजी नगराध्यक्ष अनिल सावंत, आरपीआयचे अशोक गायकवाड, स्वप्नील गायकवाड, यसूफ बागवान, आप्पा मालुसरे, स्वप्नील भिलारे, श्रीकांत निकाळजे, गणेश जाधव, संदीप साळुंखे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.