बांधकामाच्या खड्ड्यात युवक दुचाकीसह कोसळला, गंभीर जखमी; साताऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 13:29 IST2025-08-23T13:28:46+5:302025-08-23T13:29:04+5:30
युवकाला बोलता येत नसल्यामुळे त्याच्यावर घडलेला प्रसंग त्याला नीट सांगताही येत नव्हता

बांधकामाच्या खड्ड्यात युवक दुचाकीसह कोसळला, गंभीर जखमी; साताऱ्यातील घटना
सातारा : सातारा शहरातील गुरुवार परजावर बांधकामासाठी पाया खोदला आहे. या ठिकाणी शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास युवक दुचाकीसह कोसळून जखमी झाला. हा युवक मूकबधिर असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुरुवार परज येथे शासकीय व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी पायाचे खोदकाम करण्यात आलेले आहे. दुर्घटना टाळण्यासाठी चारही बाजूने पत्र्याचे कुंपण केले आहे. परंतु दक्षिणेकडील बाजूला पत्रा व्यवस्थितरीत्या लावला गेला नाही. रस्ता आणि कुंपण यामध्ये तीन-चार फुटांचे मोठे भगदाड आहे. रस्त्याच्या कडेने ये-जा करणाऱ्यांना या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
शुक्रवारी रात्री खैरमोडे (पूर्ण नाव समजले नाही) हा युवक पत्र्याच्या कुंपणाशेजारून जात होता. त्यावेळी रात्री अंधार असल्यामुळे कुंपणाखाली असलेल्या धोक्याचा अंदाज न आल्याने तो दुचाकीसह खड्ड्यात कोसळला. युवक मूकबधिर असल्याने त्याने कसाबसा आरडा-ओरडा केला. त्यावेळी परज परिसरातील युवक तातडीने मदतीसाठी धावले. सर्वांनी मिळून युवकाला कसेबसे खड्ड्यातून बाहेर काढले. या घटनेनंतर संबंधित युवकांची जखमीस शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावाधाव सुरू होती.
लोखंडी सळ्यांमुळे धोका..
परजावर बांधकामाचा पाया खोदला असून, पिलरच्या उभ्या सळ्या धोकादायक आहेत. या ठिकाणी युवक रस्त्याच्या कडेलाच कोसळला; मात्र सळ्यांपासून बचावला. त्यास किरकोळ दुखापत झाली आहे. या युवकाला बोलता येत नसल्यामुळे त्याच्यावर घडलेला प्रसंग त्याला नीट सांगताही येत नव्हता. भेदरलेल्या या जमखीला स्थानिक युवकांनी सावरले व रुग्णालयात दाखल केले. त्याची दुचाकी तशीच घटनास्थळीच पडलेली होती.