दुचाकी पार्किंगच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार, साताऱ्यातील घटना; एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 13:07 IST2025-09-16T13:06:54+5:302025-09-16T13:07:07+5:30
सहा जणांवर गुन्हा

दुचाकी पार्किंगच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार, साताऱ्यातील घटना; एकाला अटक
सातारा : दुचाकी पार्किंगच्या वादातून स्वयम विजय साबळे (वय २१, रा. शिवथर, ता. सातारा) या महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही घटना दि. १४ रोजी दुपारी सातारा बसस्थानकासमोरील सेव्हन स्टार इमारतीच्या पार्किंगमध्ये घडली.
सुमीत पवार, साहिल बामणे (रा. करंजे), गाैरव सावंत (रा. एकसळ, ता. कोरेगाव), आदित्य, यश मांढरे, प्रज्वल अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. स्वयम साबळे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सातारा बसस्थानकात गावी जाण्यासाठी बसची वाट पाहत बसलो होतो. त्यावेळी संशयित तेथे आले. मला सेव्हन स्टार इमारतीच्या पार्किंगमध्ये घेऊन गेले. तेथे गेल्या तीन महिन्यांपूर्वी सेव्हन स्टार इमारतीच्या पार्किंगमध्ये संशयितांशी दुचाकी लावण्यावरून वादावादी झाली होती.
या कारणावरून त्यांनी शिवीगाळ सुरू केली. मोबाइल हिसकावून घेतला. त्यानंतर कोयत्याने पाठीवर, खांद्यावर मारहाण केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. असे स्वयम साबळे याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, संशयित आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गाैरव सावंत याला अटक केली. इतर संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. हवालदार मोघा मेचकर हे अधिक तपास करीत आहेत.
बसस्थानकाबाहेर सातत्याने वादावादी
जखमी स्वयम साबळे याच्यावर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातारा बसस्थानकात तसेच बसस्थानकासमोर महाविद्यालयीन तरुणांची सातत्याने वादावादी होत आहे. यामुळे महाविद्यालयात बसस्थानकातून ये-जा करणाऱ्या तरुणींमध्ये दहशतीचे वातावरण आहे.