Satara: टेम्पोची दुचाकीला समोरून धडक, तरुणी ठार; टेम्पोसह चालक फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 13:10 IST2024-02-03T13:07:48+5:302024-02-03T13:10:41+5:30
लग्नासाठी कपडे खरेदी करुन घरी परताना घडली दुर्घटना

Satara: टेम्पोची दुचाकीला समोरून धडक, तरुणी ठार; टेम्पोसह चालक फरार
फलटण : फलटण-दहिवडी रस्त्यावर लग्नासाठी कपडे खरेदी करुन घरी परत जाताना दुधेबावी, ता. फलटण गावच्या हद्दीत टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकीला समोरून धडक बसली. या अपघातात तरुणीचा मृत्यू झाला.
अंकिता सुभाष मगर (वय २२, रा. मलवडी ता. माण) असे अपघातातमृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर धीरज हिंदुराव सराटे (वय २६) हा दुचाकीस्वार तरुण जखमी झाला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, फलटण ते दहिवडी रस्त्यावर दुधेबावी (ता. फलटण) गावच्या हद्दीत गुरुवार, (दि. १ फेब्रुवारी) दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान दुचाकी( एमएच११सीएक्स ८९६८) वरून धीरज सराटे आणि अंकिता मगर हे दोघे धीरज यांच्या लग्नासाठी फलटणहून कपडे खरेदी करून मलवडी (ता. माण) येथे घरी परत जात असताना दुधेबावी (ता. फलटण) गावच्या हद्दीतील ‘एस’ वळणावर दहिवडी बाजूकडून येणाऱ्या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटून जोरदार धडक दिली.
या अपघातात अंकिता मगर या तरुणीचा मृत्यू झाला असून, दुचाकीस्वार धीरज सराटे हा जखमी झाला आहे. टेम्पोचालकाने टेम्पो घेऊन तेथून पळ काढला आहे. याबाबतची फिर्याद रफिक मुलाणी यांनी दिली असून, अधिक तपास पोलिस हवालदार गार्ङे करत आहे.