Satara: कृष्णा पुलावरुन तरुणीची नदीपात्रात उडी, कऱ्हाडमधील घटना; दोन दिवसांपूर्वीच झाला होता साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:43 IST2025-07-30T16:43:12+5:302025-07-30T16:43:59+5:30
घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही

Satara: कृष्णा पुलावरुन तरुणीची नदीपात्रात उडी, कऱ्हाडमधील घटना; दोन दिवसांपूर्वीच झाला होता साखरपुडा
कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाड मधील कृष्णा नदीच्या पुलावरून एका तरुणीने थेट नदीत उडी मारल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे त्या तरुणीचा दोन दिवसांपूर्वीच साखरपुडाही झाला होता. कल्पना बाळाप्पा वाघमारे (वय २६, सध्या रा. वाखाण रोड, कऱ्हाड, मूळ रा. जत, जि. सांगली) असे उडी मारलेल्या तरुणीचे नाव आहे. घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
कल्पना वाघमारे ही तरुणी सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून कृष्णा पुलावर आली. गाडी उभी करून ती मोबाइलवरून कोणाशी तरी बोलली. त्यानंतर तिने थेट नदीत उडी मारली. ही घटना पाहून आरडाओरडा केल्यानंतर वाहनधारकांची पुलावर मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती दिल्यानंतर कऱ्हाड शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुलावर तरुणीची दुचाकी आणि सॅक आढळून आली.
दरम्यान, तरुणीशी लग्न ठरलेला मुलगा काही वेळातच घटनास्थळी पोहोचला. तसेच कुटुंबीय आणि नातेवाईकही आले. पोलिसांनी तरुणीची सॅक आणि त्यातील साहित्य दाखवल्यानंतर कुटुंबीयांनी ओळखले. त्यानंतर तरुणीच्या आईने हंबरडा फोडला. वडिलांनाही जबर धक्का बसला.
दिवसभर तरुणीचा शोध
कल्पना वाघमारे ही खासगी रुग्णालयात नोकरी करत होती. सॅकमध्ये तिची पर्स, ओळखपत्र आणि इतर साहित्य आढळून आलं. त्यावरून कल्पनानेच नदीत उडी मारल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी तातडीने एनडीआरएफ टीमला पाचारण केलं होतं. तसंच स्थानिक मच्छीमारही उपस्थित होते. मात्र, अंधारामुळे शोध मोहीम राबवता आली नाही. दरम्यान, मंगळवारी सकाळी पुन्हा तरुणीचा शोध सुरू करण्यात आला आहे.