बदलीसाठी चुकीची कागदपत्रे, थेट कारवाई होणार; सातारा जिल्हा परिषदेने गठीत केली समिती
By नितीन काळेल | Updated: May 21, 2025 19:18 IST2025-05-21T19:18:30+5:302025-05-21T19:18:57+5:30
पारदर्शकतेसाठी समिती गठीत; संकेतस्थळावर तक्रार करा

बदलीसाठी चुकीची कागदपत्रे, थेट कारवाई होणार; सातारा जिल्हा परिषदेने गठीत केली समिती
नितीन काळेल
सातारा : जिल्हा परिषदे अंतर्गत गट क आणि ड संवर्गातील कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया सुरू आहे. बदल्या पारदर्शक आणि निपक्षपाती होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आले आहे. यामुळे चुकीची कागदपत्रे सादर करुन फायदा घेणाऱ्यावर थेट कारवाईच होणार आहे. तसेच यासाठी संकेतस्थळावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
जिल्हा परिषदे अंतर्गत दरवर्षी गट क आणि ड संवर्गातील बदली प्रक्रिया पार पडते. यंदाही ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. या बदली प्रक्रियेमध्ये बनावट कागदपत्रे तयार करुन चुकीच्या पद्धतीने बदलीचा फायदा घेण्यात येतो. तसेच दिशाभूल होणारी माहिती कर्मचारी सादर करतात. याबाबत विविध माध्यमातून तक्रारी प्राप्त होत असतात. या तक्रारींची चौकशी करण्यासाठी, बदली प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि नि:पक्षपाती होण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे.
यामध्ये सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आदींचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यमाुळे बदलीसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यास समितीमार्फत चाैकशी करण्यात येईल. तसेच वस्तुस्थितीची पडताळणी करण्यात येणार आहे. बदली प्रक्रियेसाठी चुकीची कागदपत्रे तयार केल्याबाबतची तक्रार जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरही करता येणार आहे. त्यामुळे चुकीच्या पध्दतीने बदली घेणाऱ्यांविरोधात कारवाई करणे सोपे जाणार आहे.