satara- दोन पानं सुसाईड नोट लिहून गँस गाडीवरील कामगाराने संपवले जीवन, पोलिस तपास सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 13:40 IST2023-04-10T13:38:50+5:302023-04-10T13:40:14+5:30
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली

satara- दोन पानं सुसाईड नोट लिहून गँस गाडीवरील कामगाराने संपवले जीवन, पोलिस तपास सुरु
शेखर जाधव
वडूज: वडूज-कातरखटाव रस्त्यावरील एका दुकान गाळ्यात लोखंडी गजाला गळफास घेत गँस गाडीवरील कामगाराने जीवन संपवले. पेडगाव येथील ज्ञानदीप ऊर्फ संदीप विलास डोईफोडे (वय-४२) असे मृताचे नाव आहे. घटनास्थळी दोन पानी सुसाईड नोट मिळाली असून यावरुन पोलिस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुळचे पेडगाव येथील ज्ञानदीप डोईफोडे हे एका गँस कंपनीच्या गाडीवर कामगार म्हणून काम करत होते. वडूजमधील विठ्ठल नगर परिसरात पत्नी, दोन मुलांसह वास्तव्यास होते. काल, रविवारी (दि.९) सायंकाळी उशीरा ते घराबाहेर पडले होते. वडूज-कातरखटाव रस्त्यावरील एका फार्म हाऊस शेजारील दुकान गाळ्यातील लोखंडी पाईपला गळफास घेत त्यांनी जीवन संपवले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच वडूज पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार शिवाजी खाडे, गणेश शिरकुले, प्रशांत हांगे, आनंदा कदम आदी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी घटनास्थळी दोन पानी सुसाईड नोट मिळाली. या सुसाईड नोटवरून पोलिस अधिक तपास करीत आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून जाबजबाब, पंचनामा करण्याचे काम सुरू होते. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वडूज ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिस तपासानंतर आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.