Satara Crime: डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून महिलेने केला प्रियकराचा खून; पोलिसांना फोन करुन स्वतःच दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 11:45 IST2026-02-17T11:43:41+5:302026-02-17T11:45:35+5:30
खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Satara Crime: डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून महिलेने केला प्रियकराचा खून; पोलिसांना फोन करुन स्वतःच दिली माहिती
मलकापूर : डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून महिलेने प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आगाशिवनगर मलकापूर कराड येथील इंगवलेवस्ती येथे आज, मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. खून केल्यानंतर संबंधित महिलेनेच खुनाबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत महिलेस ताब्यात घेतले. खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
राजेंद्र मरीआप्पा काळे (वय-४५ रा. शिवाजी स्टेडियम च्या पाठीमागे कराड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सारिका चंद्रकांत कोळी (४० रा. इगवले वस्ती आगाशिवनगर, मलकापूर) असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यामुळे सारिका कोळी ही महिला इंगवलेवस्ती, येथे चार वर्षांपासून तीन मुलीसह वास्तव्यास आहे. दोन मुलींचे विवाह झाले आहेत. एका लहान मुलीसह ती सध्या एकटीच राहत होती. मंगळवारी रात्री प्रियकर राजेंद्र काळे हा तिच्या घरी आला. पहाटे दोघांच्यात भांडण झाले असावे. भांडणाच्या रागात संबंधित महिलेने प्रियकराच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून त्याचा खून केला.
खून केल्यानंतर स्वतः तिनेच पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दराडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तातडीने भेट दिली. घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेहासह खून करणाऱ्या महिलेस ताब्यात घेतले आहे. खुनाचे नेमके कारण काय याचा पोलिस तपास करीत आहेत.