Satara Crime: मुलाच्या एमबीबीएसच्या शिक्षणासाठी २१ लाख घेऊन महिलेची फसवणूक, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:20 IST2025-12-25T13:19:31+5:302025-12-25T13:20:40+5:30
२५० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि आठ लाखांची रोकड असा सुमारे २१ लाख रुपयांचा मुद्देमाल घेतला

Satara Crime: मुलाच्या एमबीबीएसच्या शिक्षणासाठी २१ लाख घेऊन महिलेची फसवणूक, गुन्हा दाखल
सातारा : मुलाच्या ‘एमबीबीएस’च्या शिक्षणासाठी २५० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि आठ लाखांची रोकड असा सुमारे २१ लाख रुपयांचा मुद्देमाल घेतला. मात्र, हे पैसे परत न केल्याच्या आरोपावरून सातारा शहर पोलिस ठाण्यात एका महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
अलका प्रवीण पाटील (रा. शनिवार पेठ, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित महिलेचे नाव आहे. इंदिरा विठ्ठल कोळी (वय ७३, रा. केसरकर पेठ, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित महिलेने माझ्याशी ओळख करून, मैत्री संपादन करून तिच्या मुलाच्या एमबीबीएसच्या शिक्षणासाठी पैसे घेऊन ते परत देण्याचे वचन दिले.
त्यामुळे संशयित महिलेला सोन्याचा बदाम, कानातील टाॅप्स, सोन्याची चेन, वेडणे, अंगठी, राणीहार, सोन्याच्या दोन चेन, सोन्याच्या बांगड्या, पाटल्या, दोन नेकलेस अशा प्रकारे सुमारे १३ लाख २६ हजार २६८ रुपयांचे २५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दिले; तसेच धनादेशाद्वारे आणि ऑनलाइन पद्धतीने आठ लाख रुपये असा एकूण २१ लाख २६ हजार २६८ रुपयांचा मुद्देमाल दिला; परंतु हा मुद्देमाल परत न करून तिने फसवणूक केली आहे.