साताऱ्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कारभार, भाकरी फिरविल्याने निष्ठावंत शशिकांत शिंदे यांना संधी

By नितीन काळेल | Updated: July 16, 2025 15:35 IST2025-07-16T15:33:24+5:302025-07-16T15:35:47+5:30

हुमगावात फटाके फुटले, बालेकिल्ल्याची पडझड रोखण्याचे आव्हान..

With the election of MLA Shashikant Shinde, Satara also got the opportunity to become the state president of NCP for the first time | साताऱ्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कारभार, भाकरी फिरविल्याने निष्ठावंत शशिकांत शिंदे यांना संधी

साताऱ्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कारभार, भाकरी फिरविल्याने निष्ठावंत शशिकांत शिंदे यांना संधी

नितीन काळेल

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भाकरी फिरवली असून प्रदेशाध्यक्षपदी निष्ठावंत आमदार शशिकांत शिंदे यांची निवड केली. यामुळे पवार यांच्या राष्ट्रवादीचा कारभार साताऱ्यातूनही चालणार आहे. त्याचबरोबर शिंदे यांच्या निवडीने जन्मगाव हुमगावात (ता. जावळी) फटाके फुटले असून साताऱ्यातही जल्लोष झाला. त्यातच या निवडीने साताऱ्यालाही राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष बनण्याचाही पहिल्यादा संधी मिळाली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अखेर पक्षाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राजीनामा दिला. त्यानंतर मुंबईतून प्रदेशाध्यक्षपदी आमदार शशिकांत शिंदे यांची निवड जाहीर करण्यात आली. शिंदे हे पवार यांचे विश्वासू, तसेच निष्ठावंत मानले जातात. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत फाटाफूट झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील बहुतांश नेते, पदाधिकारी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर गेले; पण काही मोजके नेते शरद पवार गटात राहिले, त्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव प्रथम होते. त्यांनीच सातारा जिल्ह्यात पक्ष टिकवून ठेवला. प्रसंगी अनेक राजकीय मातब्बरांनाही अंगावर घेतले. याच निष्ठेचे हे फळ मानले जात आहे.

बालेकिल्ल्याची पडझड रोखण्याचे आव्हान..

नूतन प्रदेशाध्यक्ष शिंदे यांना राज्याचा कारभार पाहावा लागेल. पक्षाची ताकद वाढवतानाच साताऱ्याचा ढासळलेला बालेकिल्ला पुन्हा मजबूत करावा लागेल. कारण, जिल्ह्यात आज एकही पक्षाचा आमदार नाही. हे पाहता शिंदे यांना पक्षाला जिल्ह्यात पुन्हा ऊर्जितावस्था आणावी लागणार आहे. यासाठी सत्ताधाऱ्यांनाही जेरीस आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तरच पक्षाला पुन्हा जिल्ह्यात स्थान मिळवता येईल.

शरद पवार यांचे सूचक भाष्य ठरले खरे..

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे २६ जून रोजी सातारा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकार परिषद झाली. यावेळी शशिकांत शिंदे हे पवार यांच्या बाजूला बसले होते. पत्रकार परिषद सुरू होताच शिंदे हे उठून चालले होते; पण पवार यांनी हात खांद्यावर ठेवून बसविले, तसेच शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी कधी देणार, या पत्रकारांच्या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘चर्चा सुरू आहे, बघूया’ म्हणत त्यांनी सूचक स्मितहास्य केले. एक प्रकारे शिंदे यांच्या नावाला संमतीच दर्शविली होती.

दोन मतदारसंघांत दोन-दोन वेळा आमदार..

शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांना वेळोवेळी संधी दिली आहे. १९९९ ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर शिंदे यांना पवार यांनी त्यावेळच्या जावळी विधानसभा मतदारसंघात संधी दिली. शिंदे हे पहिल्याच प्रयत्नात विजयी झाले. त्यानंतर २००४ लाही विजयी झाले. मात्र, २००८ ला मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यामुळे शरद पवार यांनी शिंदे यांना २००९ च्या निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघात उमेदवारी दिली. तेथे शिंदे यांनी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचा पराभव केला. २०१४ लाही विजय मिळवला; पण २०१९ पासून दोन पराभव कोरेगाव मतदासंघात शिंदे यांना स्वीकारावे लागले. त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीत शिंदे यांचा खासदार उदयनराजे यांच्या विरोधात निसटता पराभव झाला.

Web Title: With the election of MLA Shashikant Shinde, Satara also got the opportunity to become the state president of NCP for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.