"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 16:30 IST2025-10-27T16:28:12+5:302025-10-27T16:30:23+5:30
Phaltan Doctor Sushma Andhare: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव घेत गंभीर आरोप केले आहेत.

"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
Phaltan Doctor Sushma Andhare News: "एखाद्या गावात आपण राहतो, तिथे आपले घर असते; तेव्हा आपण हॉटेलवर राहत नाही. डॉक्टर तरुणी त्या रात्री एक वाजता हॉटेलमध्ये गेली कशी? हॉटेल मधुदीपमध्ये डॉक्टर तरुणीला प्रवेश कसा दिला गेला? तिला कायदेशीर पद्धतीने प्रवेश दिला गेला होता का? सगळी कागदपत्रे होती का? ते सगळे कागपदत्रे ते घेऊन गेले असे सांगत आहेत", असे प्रश्न उपस्थित करत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन रणजितसिंह नाईक निंबाळकरांकडून ऊसतोड मजुरांवरही अत्याचार केले जात असल्याचा आरोप केला.
डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणावर त्या म्हणाल्या की, "वैष्णवी हगवणे प्रकरणातही हेच झाले होते. त्या महिलेने आत्महत्या केली आणि तिचे चारित्र्य हनन केले गेले. तेच आता डॉक्टर तरुणीच्या प्रकरणात सुरू आहे. तिचे चारित्र्य चांगले नव्हते, ती कुणाला तरी भेटत होती. तिचे संबंध होते, असे गलिच्छ आरोप केले जात आहेत. एखादी व्यक्ती मेल्यानंतर तुम्ही त्याचे चारित्र्य हनन करत आहात, हे करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे", असा संताप सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.
डॉक्टर तरुणीचा मृतदेह सापडला ते हॉटेल कुणाचे?
"हे हॉटेल कुणाचे आहे, ते जरा सांगितले पाहिजे", असे म्हणत सुषमा अंधारे यांनी एक फोटो दाखवला, ज्यात भोसले, जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर दिसत आहेत. अंधारे म्हणाल्या, "हे हॉटेल भोसले नावाच्या माणसाचे आहे. हा भोसले कोण, रणजितसिंह नाईक निंबाळकर आता जेव्हा निवडणुका लढतील, तेव्हा भाजपचा संभाव्य नगराध्यक्षपदाचा हा उमेदवार आहे. यांच्या बाजूला जयकुमार गोरे दिसत आहेत. त्यांच्यावरही एका महिलेने आरोप केले आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकर सगळे एका फोटोत दिसत आहेत. आणि त्याच माणसाचे हे हॉटेल आहे", असा सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलवर बोलावले गेले होते का, कशासाठी बोलावले होते?
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं? हॉटेलवर बोलावलं होतं की, गेली होती? हॉटेलवर बोलावलं असेल, तर कशासाठी बोलावलं? जर तिची बहीण सांगतेय की, हातावरील हस्ताक्षर तिचं नाहीये, तर तिच्या हातावर कोणी लिहिले? डॉक्टर तरुणीची हत्या झाली का?", असे गंभीर प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले आहेत.