साताऱ्यातून कोण-कोण शपथ घेणार, आमदार मुंबईत ठाण मांडून
By दीपक देशमुख | Updated: December 14, 2024 13:05 IST2024-12-14T13:02:38+5:302024-12-14T13:05:35+5:30
दीपक देशमुख सातारा : महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी शनिवार, १४ रोजी होण्याची शक्यता असून भाजपचे दहा, शिंदेसेना आणि अजित ...

साताऱ्यातून कोण-कोण शपथ घेणार, आमदार मुंबईत ठाण मांडून
दीपक देशमुख
सातारा : महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी शनिवार, १४ रोजी होण्याची शक्यता असून भाजपचे दहा, शिंदेसेना आणि अजित पवार गटाचे चार ते पाच मंत्री असू शकतात. यामध्ये सातारा जिल्ह्यातून कोण शपथ घेणार याची उत्सुकता लागली आहे. शिंदेसेनेच्या संभाव्य यादीत शंभुराज देसाई आहेत, तर भाजपातून शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीमधून मकरंद पाटील यांचा विचार पक्षनेतृत्वाने करावा, अशी मागणी होत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादीसह घटक पक्षांच्या महायुतीने विधानसभेला तब्बल २३० जागा मिळविल्या आहेत. यापैकी सर्वाधिक जागा भाजपच्या आहेत. त्यामुळे अर्थातच भाजपच्या वाट्याला जास्त खाती येणार आहेत. सहा आमदारांमागे एक आमदार असे सूत्र मंत्रिपदासाठी निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यापैकी उद्याच्या विस्तारात भाजपातून दहाजणांची वर्णी लागू शकते.
भाजपाचे ३६ जिल्ह्यांतून व मुंबई, उपनगरांतून १३२ आमदार निवडून आले आहेत. या सर्वांतून दहाजण निवडताना प्रादेशिक व सामाजिक समतोल साधण्याची कसोटी पक्षश्रेष्ठींसमोर आहेच शिवाय ज्येष्ठता, पक्षातील मातब्बर नेते यांचाही विचार करावा लागणार आहे. तथापि, जिल्ह्यातून भाजपाचे चार आमदार निवडून गेले आहेत. त्यामुळे प्रादेशिक समतोल राखत श्रेष्ठींनी पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात सातारा जिल्ह्याचा योग्य तो सन्मान राखून अग्रक्रमाने संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.
शंभुराज देसाई प्रबळ दावेदार
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उठाव केल्यापासून त्यांची साथ देणारे त्यांचे विश्वासू शंभुराज देसाई यांनी गेल्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात उत्पादन शुल्क खात्याची जबाबदारी सांभाळली आहे. शिवाय सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही कुशल प्रशासक असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे शिंदेसेनेच्या वाट्याला आलेल्या खात्यांतून संभाव्य यादीत त्यांचे स्थान वरती असून ते प्रबळ दावेदार आहेत.
मकरंदआबांना यंदा संधी मिळणार का ?
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात बाळासाहेब पाटील यांना संधी देऊन आ. मकरंद पाटील यांना डावलण्यात आले होते. आता मकरंद पाटील हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. दोन्ही आमदारांत तेच अनुभवी व जुने आहेत. राष्ट्रवादीच्या कोट्यातून मकरंद पाटील यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
भाजपातून शिवेंद्रराजे की जयकुमार गोरे
जिल्ह्यातून मंत्रिपदाच्या शर्यतीत शिवेंद्रराजे भोसले यांचे नाव पुढे आहे. त्याचबरोबर जयकुमार गोरे यांच्या नावाचीही चर्चा आहे. शिवेंद्रराजे भोसले यांची ही पाचवी टर्म आहे. बेरजेचे राजकारण करणाऱ्या शिवेंद्रराजे भोसले यांच्या मंत्रिपदासाठी इतर आमदारही अनुकूल आहेत. दुसरीकडे आगामी पक्षवाढीसाठी जिल्हा पिंजून काढण्याची क्षमता जयकुमार गोरे यांच्यात आहे. शिवाय माढा मतदारसंघ व पर्यायाने सोलापूर जिल्ह्यात मोहिते-पाटील यांच्या वर्चस्वाला हादरा देण्यासाठी गोरे भाजपासाठी उपयुक्त आहेत. त्यादृष्टीने गोरे यांचाही विचार होऊ शकतो.